‘बाल पर्यावरण रक्षक मोहीम’ राज्यभर राबविणार; विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे – क्षमता ठाकूर

Jun 4, 2026 - 14:25
 0  0
‘बाल पर्यावरण रक्षक मोहीम’ राज्यभर राबविणार; विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे – क्षमता ठाकूर

‘बाल पर्यावरण रक्षक मोहीम’ राज्यभर राबविणार; विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे – क्षमता ठाकूर

अमरावती, प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राजनंदिनी स्मृती फाउंडेशनतर्फे राज्यव्यापी ‘बाल पर्यावरण रक्षक मोहीम’ सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण मित्र व आकाशवाणी कलाकार कु. क्षमता ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या प्रारंभी कडुलिंब, चिंच, अशोक, बदाम, अमलतास, आंबा, जांभूळ, सिताफळ, चिकू आदी वृक्षांच्या मोठ्या प्रमाणात बिया पडतात. या बियांचे योग्य संवर्धन न झाल्याने त्या वाया जातात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांच्या बिया संकलित करून त्यापासून रोपे तयार करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेत विद्यार्थी घरातील जुने प्लास्टिक ग्लास, रिकाम्या बाटल्या, दुधाचे रॅपर तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा कुंडी म्हणून वापर करून रोपे तयार करणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेली रोपे शाळेत आणायची असून उर्वरित बिया शाळेच्या ‘राजनंदिनी सीड बँक’मध्ये जमा केल्या जाणार आहेत. या बियांचा वापर सीड बॉल निर्मिती व वृक्षारोपणासाठी करण्यात येणार आहे.

शाळांनी विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक कार्याची नोंद घेऊन तयार झालेली रोपे शाळा परिसरात लावावीत किंवा स्थानिक नागरिकांना द्यावीत, तसेच प्रत्येक शाळेत छोटी रोपवाटिका उभारण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची सवय रुजेल आणि पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित होईल, असा विश्वास क्षमता ठाकूर यांनी व्यक्त केला.

या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल पर्यावरण रक्षकाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापन आणि वृक्षसंवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना चालना देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पालकांनी मुलांचा मोबाईल व टीव्हीवरील वेळ कमी करून त्यांना निसर्गाशी जोडण्यासाठी या मोहिमेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहनही करण्यात आला आहे

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0