मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत भाजपाचे 'सेवा दशक'; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम

Jul 20, 2026 - 12:56
 0  0
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत भाजपाचे 'सेवा दशक'; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत भाजपाचे 'सेवा दशक'; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम

अमरावती 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्हा संघटनेतर्फे 'सेवा दशक' अभियान राबविण्यात येणार आहे. या दहा दिवसांत जिल्हाभर रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, अन्नदान, महिला सन्मान, महाराजस्व अभियान आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अभियानासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. संजय कुटे आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून, विविध आमदार, पदाधिकारी आणि नगराध्यक्ष यांचा त्यात समावेश आहे.

२१ जुलैपासून अभियानाची सुरुवात आकोली रेल्वे स्थानकावरून पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना फराळ व पाणी वितरणाने होणार आहे. २२ जुलै रोजी अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरात महाआरती, महिलांचा सत्कार तसेच विविध ठिकाणी महिला मोर्चाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय अचलपूर, तिवसा, मोर्शी-वरूड, धामणगाव रेल्वे, मेळघाट आणि अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रक्तदान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे.

आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या पुढाकाराने चष्मे वाटप, वारकऱ्यांचा सत्कार, आरोग्य शिबिर, रक्तदान, अन्नदान तसेच १ ऑगस्ट रोजी माजी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांचे स्पर्धा परीक्षा, व्यसनमुक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकास विषयावरील मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

२ ऑगस्ट रोजी सेवा दशकाचा समारोप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात २५ दिव्यांग बांधवांना स्कूटर वाटप करून करण्यात येणार असून, जिल्ह्यातील मंडळ व बूथ स्तरावरही विविध सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0