“बैलबंडीवरून निघाली वरात; शेतकरी संस्कृतीचा अनोखा सन्मान”
“बैलबंडीवरून निघाली वरात; शेतकरी संस्कृतीचा अनोखा सन्मान”
तालुक्यातील पहिल्यांदाच असा पारंपरिक विवाह सोहळा; तलाठी राहुल याटावार यांचा अनोखा उपक्रम
भद्रावती
चंद्रपूर ज़िल्हातील मुल तालुक्यातील सिंताळा-येरगाव येथे कार्यरत तलाठी राहुल उर्फ सुशांत याटावार यांनी आपल्या विवाह सोहळ्याला ग्रामीण संस्कृतीची अनोखी झळाळी देत पारंपरिक पद्धतीने विवाह संपन्न केला. रविवार, दिनांक 10 मे रोजी बैलबंडीवरून वरात काढून शेतकरी वेषभूषेत हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
आधुनिक डीजे, आलिशान गाड्या आणि दिखाऊपणाला फाटा देत याटावार यांनी शेती, मातीतली संस्कृती आणि शेतकऱ्यांविषयीचा आदर जपत पारंपरिक रितीरिवाजांना प्राधान्य दिले. विशेष म्हणजे, मुल तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे बैलबंडीवरून वरात काढत शेतकरी थाटात विवाह सोहळा साजरा करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले. गावातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराने या अनोख्या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या विवाह सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, बैलांची आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर आणि ग्रामीण परंपरेचे जतन करणारे विविध रितीरिवाज पाहायला मिळाले. बैलबंडीवरून निघालेल्या वरातीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. युवकांमध्येही या विवाह सोहळ्याबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळाली. ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपत आधुनिक काळातही परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा विवाह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
सुशांत याटावार हे दोन वर्षांपूर्वी झालेल्या तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून सध्या सिंताळा-येरगाव येथे कार्यरत आहेत. भगतसिंग वार्ड येथील रहिवासी असलेल्या याटावार कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि शेतकरी जीवनशैलीचा सन्मान करणारा हा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0