जात-धर्माचे राजकारण करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न!

Apr 16, 2026 - 21:32
Apr 16, 2026 - 21:33
 0  1
जात-धर्माचे राजकारण करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न!

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी परतवाडा मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला.

अमरावती/१६ – परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले असून, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी भाजपवर 'दंगल भडकवण्याचा प्रयत्न' केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

पत्रकारांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अमरावतीमध्ये जे घडले ते अत्यंत घृणास्पद आहे. कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे. या घटनेमुळे कोणताही संवेदनशील व्यक्ती संतप्त होईल. मात्र, पीडित मुलगी ही केवळ एक पीडित आहे; तिला कोणतीही जात किंवा धर्म नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, पण समाजात तणाव निर्माण करण्यासाठी या घटनेचा राजकीय वापर करणे चुकीचे आहे."

* भाजपवर गंभीर आरोप

यशोमती ठाकूर यांनी भाजपवर थेट निशाणा साधत विचारले, "लोकांना भडकवून आणि जातीय-धार्मिक राजकारण खेळून भाजपला दंगली घडवायच्या आहेत का? गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याऐवजी समाजात फूट पाडणे हा देखील एक गुन्हा आहे. मग अशा प्रकरणांमध्ये गुन्हे का दाखल केले जात नाहीत?" * सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न?

मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर असला तरी, या प्रकरणाला धार्मिक वळण देऊन राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला. त्यांनी प्रशासनाला आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले, परंतु कोणत्याही परिस्थितीत अमरावतीचा सामाजिक सलोखा बिघडवता कामा नये, असेही म्हटले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0