सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी
सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी
अमरावती | २१ जुलै – अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवारी सुकळी येथील कंपोस्ट डेपो आणि श्वान दहन केंद्राची पाहणी करून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांचा आढावा घेतला.
कंपोस्ट डेपोमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण, सेंद्रिय खत निर्मिती, वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट, यंत्रसामग्रीची स्थिती आणि मनुष्यबळाच्या कामकाजाची माहिती त्यांनी घेतली. कंपोस्ट निर्मिती अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बायोमायनिंग, सॅनिटरी लँडफिल डेव्हलपमेंट आणि घनकचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या आरडीएफ व इतर उपउत्पादनांच्या विल्हेवाटीबाबतही चर्चा करण्यात आली.
डेपो परिसरात स्वच्छता राखणे, दुर्गंधी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे, पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी नियोजन करणे आणि पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर श्वान दहन केंद्राची पाहणी करताना दहन प्रक्रिया, उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि यंत्रणेची माहिती घेण्यात आली. भटक्या व मृत श्वानांची विल्हेवाट वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने होत आहे का, याची खात्री करून केंद्र अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, पशुशल्य चिकित्सक डॉ. तुषार पोहनकर, अभियंता विवेक देशमुख, राजेश आगरकर तसेच संबंधित अधिकारी, अभियंते, कंत्राटदार प्रतिनिधी आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0