मी त्याच्यावर जळत नाही पण..; ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमार स्पष्टच म्हणाला..

Mar 16, 2026 - 22:18
 0  5
मी त्याच्यावर जळत नाही पण..; ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमार स्पष्टच म्हणाला..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अक्षय कुमार 'धुरंधर' या चित्रपटाविषयी आणि त्यातील रणवीर सिंहच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर ब्लॉकबस्टर ठरला, शिवाय तो इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनाही खूप आवडला. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करत चित्रपट यशस्वी ठरणार असल्याची पोचपावती दिली. त्याचसोबत अनेक अभिनेत्यांच्या मनात ‘धुरंधर’सारखा एखादा चित्रपट किंवा तशा चित्रपटातील एखादी भूमिका मिळावी, अशी सुप्त इच्छा निर्माण झाली. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षयच्याही मनात अशीच काहीशी भावना आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो फिल्म इंडस्ट्रीच्या बदलच्या पॅटर्नबद्दल आणि ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या भूमिकेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’दरम्यान अक्षय कुमार म्हणाला, “ही फिल्म इंडस्ट्री वर्तुळासारखी आहे. दर दोन ते तीन वर्षांनंतर ही इंडस्ट्री बदलत असते. आपला प्रेक्षकवर्ग त्याच्या मागण्यांनुसार बदलत असतो. तुम्ही ‘धुरंधर’चंच उदाहरण पहा. हा एक अॅक्शनपच आहे आणि त्यात भरपूर रक्तपात दाखवण्यात आला आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला, त्यांनी तो एंजॉय पण केला. यामध्ये रणवीर सिंहसारखा हिरो एका अत्यंत संतप्त तरुणाच्या भूमिकेत आहे, जे मध्यंतरीच्या काळात थांबलं होतं. पाच ते सहा वर्षांपूर्वी मी काही सामाजिक विषयांवरील चित्रपट केले, ते बरेच चालायचे. आता हॉरर कॉमेडीची वेळ आली आहे. स्त्री सारख्या चित्रपटाने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्वकाही बदलत राहतं आणि पुढे प्रेक्षकांना काय आवडेल हे आम्हालाही माहीत नाही.”

‘धुरंधर’सारख्या चित्रपटात भूमिका न मिळाल्याबद्दल तुला पश्चात्ताप होतो का किंवा ईर्षा वाटते का, असा प्रश्न विचारला असता अक्षयने उत्तर दिलं, “मी ल्यारी गँगमधला गँगस्टर साकारण्यासाठी योग्य आहे, असं आदित्यला वाटलं असेल असं मला वाटत नाही. त्याने तसा विचार केला नसावा, त्यामुळेच मला भूमिका मिळाली नसावी. मी रणवीरला भेटलो तेव्हा त्याने माझ्या कामाचं कौतुक केलं. काही माझ्या भूमिका साकारण्याची त्याची इच्छा आहे, तर मला काही त्याच्या भूमिका साकाराव्याशा वाटतात. हिंदी सिनेसृष्टीत आम्ही 15 ते 20 अभिनेते आहोत आणि भारतात 180 चित्रपट बनतात. प्रत्येकाची एक भूमिका असते. आम्हालासुद्धा तशी भूमिका साकारण्याची संधी मिळावी अशी खंत वाटते, पण अर्थातच त्यात कोणतीच ईर्षा नाही”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0