एच.पी. गॅस सिलिंडरच्या अवैध साठेबाजीवर तहसील प्रशासनाची धडक कारवाई

Jun 2, 2026 - 15:06
 0  0
एच.पी. गॅस सिलिंडरच्या अवैध साठेबाजीवर तहसील प्रशासनाची धडक कारवाई

एच.पी. गॅस सिलिंडरच्या अवैध साठेबाजीवर तहसील प्रशासनाची धडक कारवाई
भरलेले १४ व रिक्त २६ सिलिंडर जप्त; गुन्हा दाखल

भद्रावती :
 शहरातील गुरुनगर परिसरात एच.पी. गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात सिलिंडर जप्त केले. या कारवाईमुळे अवैध गॅस विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे व पुरवठा निरीक्षक वैभव सोळंके यांनी गुरुनगर येथील प्रतीक वाभिटकर यांच्या राहत्या घरी छापा टाकला. या कारवाईदरम्यान एच.पी. गॅस कंपनीचे भरलेले १४ व रिक्त २६ असे एकूण ४० सिलिंडर पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सिलिंडर हे “प्रतीक गॅस एजन्सी, वरोरा” यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अवैध साठेबाजी व विक्रीप्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुरवठा निरीक्षक वैभव संजय सोळंके यांच्या फिर्यादीवरून अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरची अवैधरित्या साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तहसील प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0