उमरी अरब ग्रामपंचायतीत उपसरपंचाची नागरिकाला अपमानास्पद वागणूक; घरकुल भ्रष्टाचाराची चौकशी

Sep 3, 2026 - 18:07
 0  2
उमरी अरब ग्रामपंचायतीत उपसरपंचाची नागरिकाला अपमानास्पद वागणूक; घरकुल भ्रष्टाचाराची चौकशी

उमरी अरब ग्रामपंचायतीत उपसरपंचाची नागरिकाला अपमानास्पद वागणूक; घरकुल भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची तक्रारदाराची मागणी
​मुर्तिजापूर 
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत उमरी अरब येथे २९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ग्रामसभेत नागरिकाने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी उपसरपंचांनी अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा तसेच ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रारदार वकारबीन अब्दुल सत्तार चाऊस (रा. उमरी अरब) यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुर्तिजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
​तक्रारदाराच्या नमूद माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात सार्वजनिक हितोद्देशी प्रश्न विचारले होते. यावेळी सरपंचा उपस्थित नव्हत्या. प्रश्नांचे निरसन करण्याऐवजी उपसरपंच अनिस बीन इद्रिस चाऊस यांनी इतर नागरिकांच्या उपस्थितीत "उखाड ले, जो उखाडना है" असे शब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
​याशिवाय, उमरी अरब ग्रामपंचायतीमधील घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामसभेस सरपंच स्वतः कधीही हजर राहत नसून, त्यांचे पती (जे स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत) हेच सरपंच पदाचा सर्व कारभार बेकायदेशीरपणे सांभाळतात व घटनात्मक पदाचा गैरवापर करतात, असेही तक्रारदाराने निदर्शनास आणून दिले आहे.
​प्रमुख मागण्या आणि उपोषणाचा इशारा:
​ग्रामसभेतील घटनेची निष्पक्ष चौकशी करून उपसरपंचांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
​ग्रामपंचायतीमधील घरकुल घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी.
​भविष्यात ग्रामसभेत नागरिकांना सन्मानपूर्वक वातावरणात प्रश्न विचारता यावेत यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत.
​सदर प्रकरणी प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई व सखोल चौकशी न झाल्यास गट विकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा वकारबीन अब्दुल सत्तार चाऊस यांनी दिला आहे. या अर्जाच्या प्रती उपविभागीय अधिकारी (मुर्तिजापूर), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प. अकोला) आणि तहसीलदार (मुर्तिजापूर) यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0