राजापेठ पोलिसांची कारवाई : चार आरोपी अटकेत, तीन गुन्ह्यांची उकल

May 26, 2026 - 18:04
 0  0
राजापेठ पोलिसांची कारवाई : चार आरोपी अटकेत, तीन गुन्ह्यांची उकल

राजापेठ पोलिसांची कारवाई : चार आरोपी अटकेत, तीन गुन्ह्यांची उकल

अमरावती : शहरातील राजापेठ पोलिसांनी घरफोडी प्रकरणात चार आरोपींना अटक करून तीन गुन्ह्यांची उकल केली असून सुमारे ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश जनार्दन जोग यांनी २२ मे २०२६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी घरी झोपले असताना त्यांच्या आईने पहाटे ५ वाजताच्या सुमारास आवाज देऊन उठविले. घराबाहेर पाहणी केली असता काही महिला व पुरुष कटल्यामध्ये सामान घेऊन जाताना दिसले. कटल्यातील साहित्य तपासले असता घरातील अॅमरॉन बॅटरी, इलेक्ट्रिक वायर व लोखंडी पाइप चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४५२/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून नसीन शहा रमेश भोसले (वय १९), सुशीला आवेश भोसले (वय २०), संकीता अंगेश भोसले (वय २०, सर्व रा. नेहरू मैदान, अमरावती) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या साथीदार मुलचंद सुलतचंद पवार (वय ३२, रा. राजकमल चौक परिसर, अमरावती) याचे नाव समोर आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली.

आरोपींकडून चोरीतील अॅमरॉन बॅटरी, इलेक्ट्रिक वायर, लोखंडी पाइप, तीन चाकी कटला रिक्षा तसेच इतर ठिकाणांहून चोरी केलेला अॅल्युमिनियम गंज, स्टीलचे धामे, एक बर्नरची शेगडी आणि एचपी कंपनीचे सहा सिलेंडर असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपींनी राजापेठ पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्री. रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, रोशन चटे तसेच पोलिसांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0