विहीर बांधकाम साहित्य चोरी प्रकरणाचा पोलिसांकडून छडा; सहा जणांना अटक
विहीर बांधकाम साहित्य चोरी प्रकरणाचा पोलिसांकडून छडा; सहा जणांना अटक
अमरावती, दि. १० जून : भातकुली तालुक्यातील बोरखडी परिसरात विहीर बांधकामासाठी ठेवलेले साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा खोलापूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
दामोदर अण्णाजी पवार यांनी बोरखडी खुर्द येथील शेतात विहीर खोदण्याचे व बांधण्याचे काम घेतले होते. ५ जून रोजी काम थांबवून त्यांनी साहित्य शेतात ठेवले होते. ८ जून रोजी सकाळी ते कामाच्या ठिकाणी पोहोचले असता ६० हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी खोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयितांची चौकशी केली. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली देत साहित्य टाटा २०७ वाहनातून नेऊन खोलापूर येथील भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहिती दिली.
पोलिसांनी तीन मुख्य आरोपी, दोन भंगार व्यावसायिक आणि वाहन चालक अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेले लोखंडी तराफे, सिमेंट कालवण्याचे टप आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेली ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खोलापूर पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0