संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
निरोगी आयुष्यासाठी योग आवश्यक – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एम.ए. योगशास्त्र व पी.जी. डिप्लोमा योगा थेरपी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना डॉ. बारहाते म्हणाले की, बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत आरोग्य जपणे हे मोठे आव्हान बनले आहे. शिक्षण व रोजगारासाठी तरुण पिढी मोठ्या शहरांकडे वळत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. अशा परिस्थितीत शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो. योग ही भारताची प्राचीन आणि समृद्ध परंपरा असून ती प्रत्येकाने दैनंदिन जीवनात अंगीकारण्याची गरज आहे.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग चिकित्सक व योग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया चकोले यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अवघड वाटणारी योगासने सोप्या पद्धतीने शिकवून योगाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. राजीव बोरकर, डॉ. निलेश कडू, श्री. मंगेश वरखेडे व डॉ. विलास नांदुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा व महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. अनघा देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राजेश पिदडी यांनी केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0