विश्व नेत्रदान दिवसानिमित्त अमरावतीत भव्य जनजागृती पदयात्रा

Jun 9, 2026 - 13:51
 0  0
विश्व नेत्रदान दिवसानिमित्त अमरावतीत भव्य जनजागृती पदयात्रा

विश्व नेत्रदान दिवसानिमित्त अमरावतीत भव्य जनजागृती पदयात्रा

"मेरे जीवन का अंतिम उपहार – राष्ट्र के नाम" अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. ८ जून : महाराष्ट्र शासनाच्या अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत १० जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या विश्व नेत्रदान दिवसानिमित्त अमरावती शहरात भव्य जनजागृती पदयात्रा व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरीना फाऊंडेशन, अमरावती व विश्व नेत्रदान दिवस आयोजन समिती २०२६-२७ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यावर्षीचा संदेश "मेरे जीवन का अंतिम उपहार – राष्ट्र के नाम" असा असून नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.

१० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता नेहरू मैदान येथून जनजागृती पदयात्रेला प्रारंभ होईल. ही पदयात्रा राजकमल चौक, शाम चौक, बापट चौक, प्रभात टॉकीज, जवाहर रोड, सरोज चौक, जयस्तंभ, सिटी कोतवाली मार्गे पुन्हा राजकमल चौक येथे समाप्त होणार आहे.

पदयात्रेच्या प्रारंभी नागरिक, सामाजिक संस्था व विविध संघटनांना "मेरे जीवन का अंतिम उपहार – राष्ट्र के नाम" या संदेशासह सामूहिक संकल्प घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागी नागरिक हातात नेत्रदान जनजागृती फलक, प्रतीकात्मक डोळा व तिरंगा घेऊन पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ७.३० वाजता राजकमल चौक येथे नेत्रदाता, अवयवदाता व देहदाता कुटुंबीयांचा कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेते भरत गणेशपुरे उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार बळवंतराव वानखेडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, आमदार सौ. सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, आमदार राजेश वानखेडे, माजी खासदार अनंतराव गुडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार जगदीश गुप्ता, विलास इंगोले, बबलू शेखावत व डॉ. नितीन धांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

शहरातील विविध व्यापारी, सामाजिक, धार्मिक व राजकीय संस्था या पदयात्रेत सहभागी होणार असून नेत्रदान, अवयवदान व देहदानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

"आपणही वाढवू मानवतेचा सन्मान – करूया नेत्रदान, अवयवदान आणि देहदान" या संदेशासह आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0