पावसाळ्यात साथरोगांवर आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम
पावसाळ्यात साथरोगांवर आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम
अमरावती | 21 जुलै: पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने शहरभर विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, स्वच्छता आणि जनजागृती मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंगळवारी आयुक्तांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. बैठकीला आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यांचे निर्मूलन, साचलेल्या पाण्याचा निचरा, लार्वीसाईड (एमएलओ ऑइल) फवारणी, नियमित फॉगिंग आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर भर देण्यात आला. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
आशा सेविकांमार्फत घराघरांत जाऊन कुलर, टायर, फुलदाण्या, मडकी व इतर पाणीसाठ्यांची तपासणी केली जाणार असून "एक दिवस – कोरडा दिवस (ड्राय डे)" ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचू न देणे, मच्छरप्रतिबंधक जाळ्या बसविणे आणि स्वच्छता राखणे, असे आवाहन करण्यात आले.
याशिवाय शासकीय व खासगी रुग्णालयांमधील साथीच्या रोगांच्या रुग्णांची नियमित नोंद ठेवून विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता, फवारणी व फॉगिंग अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्व विभागांनी तातडीने आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. लोकप्रतिनिधींनीही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून परिसर स्वच्छ ठेवावा आणि अमरावती शहर रोगमुक्त ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0