सलीम खान यांची तब्येत बिघडली; सलमान खान तडकाफडकी लीलावतीमध्ये

Feb 17, 2026 - 15:28
 0  1
सलीम खान यांची तब्येत बिघडली; सलमान खान तडकाफडकी लीलावतीमध्ये

Salim Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सलमानसुद्धा तडकाफडकी रुग्णालयात पोहोचला आहे.

ज्येष्ठ पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत अचानक खालावल्याने चाहत्यांकडून काळजी व्यक्त होत आहे. सलीम खान यांना मुंबईतील वांद्रे इथल्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे रुग्णालय त्यांच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटजवळच आहे. पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. लीलावती रुग्णालयाबाहेरील हा व्हिडीओ आहे. ‘सलीम खान लीलावती रुग्णालयात दाखल’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सलमानसुद्धा वडिलांना भेटण्यासाठी तडकाफडकी लीलावती रुग्णालयात दाखल झाला आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसून आली. सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीच अपडेट देण्यात आली नाही. त्यांना नेमका कोणता त्रास जाणवत होता, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलीम खान सध्या आयसीयूमध्ये आहेत. मंगळवारी सकाळी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पटकथालेखक आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. सलीम-जावेद म्हणून ते ओळखले जायचे. नुकताच त्यांनी लग्नाचा 61 वा वाढदिवस साजरा केला होता. सलीम खान यांनी 1964 मध्ये सलमा यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. तर 1981 मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलन आणि सलीम यांनी अर्पिताला दत्तक घेतलं.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सलीम खान यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. 24 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो आणि दुर्दैवाने गेल्या वर्षी याच दिवशी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सलीम खान यांना नेमकं काय झालंय, याविषयी चाहत्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत. खान कुटुंबाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळण्याचीही प्रतीक्षा चाहते करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0