शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके; मनपाचा ५० हजार विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

Jun 9, 2026 - 13:16
 0  0
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके; मनपाचा ५० हजार विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके; मनपाचा ५० हजार विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

अमरावती, 
अमरावती महानगरपालिकेने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी मोफत पाठ्यपुस्तक वितरण मोहिमेला सुरुवात केली असून शहरातील ५०,१९१ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, जिल्हा परिषद, मनपा आणि अनुदानित शाळांमधील मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जात आहेत. या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते करण्यात आला.

८ ते ११ जून दरम्यान चपराशीपुरा येथील मनपा मराठी शाळा क्र. १३ आणि मनपा उर्दू शाळा क्र. ६ या केंद्रांवरून पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. वितरण प्रक्रियेसाठी शाळानिहाय व माध्यमनिहाय स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळावीत, वितरणात पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही शाळेला पुस्तकांची कमतरता भासू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत वितरण प्रक्रिया सुरळीत पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी होणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुरुवात पहिल्याच दिवसापासून करता येणार आहे. महानगरपालिका शिक्षण विभागाने यंदा शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पाठ्यपुस्तके पोहोचविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0