शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट, अर्धातास पवार कुटुंबामध्ये चर्चा, नेमकं काय ठरलं?

Feb 4, 2026 - 21:54
 0  0
शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट, अर्धातास पवार कुटुंबामध्ये चर्चा, नेमकं काय ठरलं?

मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे, यावेळी पवार कुटुंबामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच भेट आहे, तसेच सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार चर्चा देखी सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या भेटीवेळी शरद पवारांसह पूर्ण पवार कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते, फक्त यावेळी सुप्रिया सुळे या उपस्थित नव्हत्या. शरद पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी आले होते.

सहयोग निवासस्थानी यावेळी पवार कुटुंबामध्ये अर्धातास चर्चा झाली, या भेटीनंतर शरद पवार सहयोग सोसायटीमधून बाहेर पडून, गोविंदबागेकडे रवाना झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची ही अजित पवार यांच्या निधनानंतर आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलीच भेट होती, दरम्यान या भेटीपूर्वी दुपारी शरद पवार यांची पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत भेट झाली होती. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकी काय चर्चा झाली? 

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते असा दावा शरद पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नसलं तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनकरण, अजितदादांचे स्मारक, त्याच बोरोबर विविध सहकारी संस्थांसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला पवार कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0