रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणी महत्त्वाची अपडेट; आरोपींविरोधात मोठी कारवाई
रोहित शेट्टीच्या जुहू इथल्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या म्हणजेच मकोकाच्या तरतुदी लागू केल्या आहेत.
निर्माते-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू इथल्या निवासस्थानाबाहेर झालेल्या हाय-प्रोफाइल गोळीबाराच्या घटनेत मुंबई पोलिसांनी मकोका (MCOCA) लावला आहे. 31 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर पाच राऊंड गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालं नव्हतं. या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेनं तातडीने कारवाई केली. गोळीबार करून पसार झालेल्या पाच आरोपींना वारजे पोलिसांनी पुण्यातून अटक केली. वारजे पोलिसांच्या पथकाने वारजे, कर्वेनगर, धायरी आणि नऱ्हे भागात कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके, अमन आनंद मराठे अशी आरोपींची नावं आहेत.
गुंड लॉरेन्स बिष्णोईचा निकटवर्तीय आरजू बिष्णोई याने साथीदारांशी संगनमत करून गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर बिष्णोईने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत जबाबदारी स्वीकारली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास सुरू केला. रोहित शेट्टीच्या निवासस्थानाजवळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले होते. आरोपी दुचाकीवरून तिथे आले होते आणि गोळीबार करून तिथून पसार झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी आरोपी सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ यांनी पुण्याहून मुंबईला एक दुचाकी आणली आणि ती मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केली. हीच दुचाकी गोळीबार करणाऱ्याने वापरल्याचा आरोप आहे. गोळीबार करणारा संशयित हा मूळचा बिहारचा रहिवासी असून चार ते पाच साथीदारांसह तो मुंबईत राहिला होता. घटनेपूर्वी त्याने रोहित शेट्टीच्या घराची तीन ते चार वेळा पाहणी केली होती, असंही म्हटलं जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी स्वप्नीलकडून एक पिस्तुल, तीन मॅगझिन आणि एक एअर गन जप्त केली. पुढील तपासात असं दिसून आलं की अटक झालेल्या आरोपी आसाराम फसाळे याने मुख्य आरोपी शुभम लोणकरच्या सुचनेनुसार स्वप्नीलला ही शस्त्रे पुरवली होती.
वारजे परिसरातील गुंड शुभम लोणकर याआधी बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात सामील असल्याचं उघडकीस आलं होतं. त्याने सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. या घटनेनंतर लोणकर पसार झाला असून अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला पोलिसांनी अटक केली होती.
शुभम लोणकर आणि त्याच्या साथीदारांचं बिष्णोई गँगशी जवळचे संबंध असल्याचं उघडकीस आल्यावर पुणे आणि मुंबई पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पंजाब, हरयाणामध्येही त्याचा शोध घेण्यात आला. परंतु अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0