चिखला गावातील घटनेवरून वाघमारेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप, थेट गृहविभागाकडे केली मोठी मागणी

Feb 23, 2026 - 22:19
 0  6
चिखला गावातील घटनेवरून वाघमारेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप, थेट गृहविभागाकडे केली मोठी मागणी

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे, यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी दोन गटात जोरदार राडा झाला होता. सध्या यावरून गावात वातावरण चांगलंच तापलं आहे. गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजीवनी वाघ जरांगे पाटलांच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगे हेच असे कट रचू शकतात. अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक करून जसा दंगलीचा प्रकार केला, तसाच या ठिकाणी दंगलीचं प्रकरण शिजत आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू आहे, असा आरोप यावेळी नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले वाघमारे? 

बुलढाण्याची जी घटना आहे ते एखादं कटकारस्थान आहे का? याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण संजीवनी वाघ जरांगेच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगेच असे कट करू शकतात. जरांगेंची प्रसिद्धी संपलेली आहे, टीआरपी राहिला नाही, लोक येत नाही, समाजातील लोकांनी आता बाजूला केलंय. परंतु गर्दीची सवय आता लागलेली आहे. आम्ही त्या गावांमध्ये नेमकं काय घडलं त्याबद्दल माहिती घेतली आहे. सगळ्या गावाने ठरवलं होतं, फक्त पुतळ्याची जागा बदलायची होती. परंतु मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले. त्यांची भाषा अतिशय चुकीची होती, असं यावेळी वाघमारे यांनी म्हटलं आहे.

जरांगेंच्या डोक्यात फक्त आमचं आणि तुमचंच आहे, असं करून त्यांना फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे. माजी गृह विभागाला विनंती आहे, जरांगे यांचे सीडीआर तपासा, त्या भागातील कोणत्या लोकांसोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला, यातून काही कट शिजत होता का? याकडे देखील गृह विभागाने लक्ष दिलं पाहिजे. या कटामध्ये जर मनोज जरांगे पाटलांचा सहभाग असेल तर त्यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा येणारा काळ वाईट असेल, असं वाघमारे यांनी यावेळी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0