Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर मोठं संकट? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी, पैसे सुरू राहणार का?

Feb 27, 2026 - 16:23
 0  0
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर मोठं संकट? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी, पैसे सुरू राहणार का?

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता या योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं की, आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, त्यांना 2100 रुपये देऊ. मात्र राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. 2100 रुपये कधीपासून मिळणार याची राज्यातील सर्व महिला वर्गाला प्रतिक्षा असतानाच आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात सुरुळीत सुरू राहणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता या योजनेबाबत अधिवेशनात बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे. ‘लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होत आहे,’ असं विधान गणेश नाईक यांनी केलं आहे. आदिवासी पाड्यात रस्ते होणार नसतील तर धनगर वाडे जोडण्यासाठी रस्ते करणार का? असा प्रश्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे.

सरकारचे विविध प्रकल्प सुरू आहेत, त्यात लाडकी बहीण योजना देखील सुरू आहे, यामुळे इतर खात्यावर अन्याय होण्याची परिस्थिती आता ओढावली आहे, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. गणेश नाईक यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणारा ताण अधोरेखित झाला आहे. त्यामुळे आता या योजनेचं भवितव्य नेमकं काय असणार? ही योजना सुरूच राहणार का? महिलांना दर महिन्याला पैसे मिळणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0