मतदारयादीतील दुबार नावे टाळण्यासाठी ‘एसआयआर’ मॅपिंगला सहकार्य करा – आ. सुलभाताई खोडके

May 30, 2026 - 14:46
 0  0
मतदारयादीतील दुबार नावे टाळण्यासाठी ‘एसआयआर’ मॅपिंगला सहकार्य करा – आ. सुलभाताई खोडके

मतदारयादीतील दुबार नावे टाळण्यासाठी ‘एसआयआर’ मॅपिंगला सहकार्य करा – आ. सुलभाताई खोडके

अमरावती, दि. 30 मे : भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारयादीची पडताळणी व मॅपिंग प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले आहे.

अमरावती विधानसभा मतदारसंघात वर्ष 2002 व 2024 च्या मतदारयाद्यांची तुलना करून मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी 322 बीएलओ आणि 31 पर्यवेक्षक कार्यरत आहेत. निवडणूक विभागाने आतापर्यंत सुमारे 71 टक्के मॅपिंग पूर्ण केले असून उर्वरित मतदारांनी तातडीने आपल्या बीएलओंशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंद असण्याची शक्यता आहे. अशा दुबार नोंदी दूर करून मतदारयादी अधिक अचूक करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग पूर्ण झालेले नाही, त्यांना पुढील प्रक्रियेत जन्मतारखेच्या पुराव्यासह विविध कागदपत्रे सादर करावी लागू शकतात.

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने मतदारयादींच्या ‘विशेष सखोल पुनर्निरीक्षण’ मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण करतील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार असून 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम मतदारयादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0