पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार, आत्याने दिला मोलाचा सल्ला, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Mar 5, 2026 - 17:00
 0  0
पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार, आत्याने दिला मोलाचा सल्ला, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सल्ला दिला आहे.

महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीने शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आभार मानले आहेत. दरम्यान तर दुसरीकडे पार्थ पवार हे यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार आहेत, यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार हे पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. तुमच्याकडे देखील लोकसभेचा प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून तुम्ही पार्थ पवार यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यत आला होता.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

एक गोष्ट जी आदरणीय पवार साहेबांनी मला सांगितली. ती गोष्ट मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते. राज्यसभेत आणि लोकसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल बोलायची संधी मिळेल, तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं. कारण तिथे जे व्यक्ती बसले आहेत, ते आपल्या पेक्षा जास्त जाणतात, आणि संपूर्ण देश आपल्याकडे बघत असतो. त्यामुळे हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला पवार साहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, ती मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. जेव्हा मी लोकसभेची निवडणूक जिंकली तेव्हा, मी प्रथमच संसदेमध्ये पोहोचले. मी आणि पवार साहेब आम्ही दोघं एकाच गाडीने पार्लमेंटमध्ये जातो. तेव्हा जुन्या पार्लमेंटची बिल्डिग होती. तिथे एक जीना आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो, तेव्हा पवारसाहेब मला म्हटले होते, की ही तू जी सीडी चढते आहेसना ती फक्त आणि फक्त बारामती मतदारसंघामुळेच त्याची संधी तुला मिळाली आहे, त्यामुळे याची कायम जाणीव ठेव. या भावनेशी इमानदार राहा असा सल्ला मला त्यावेळी पवार साहेबांनी दिला होता. त्यामुळे एक आत्या म्हणून सहकारी म्हणून जर मला कोणी विचारलं तर हाच सल्ला मी देईल असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0