अजितदादांच्या राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र ? केली ही महत्वाची मागणी

Jan 29, 2026 - 21:58
Jan 29, 2026 - 21:59
 0  1
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र ? केली ही महत्वाची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सह अनेक नेते मंडळी यावेळी अंत्यदर्शनाला उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईहून बारामतीला येताना बुधवारी सकाळी ८.४८ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळाशेजारीच त्याचे प्रायव्हेट चार्टर विमान कोसळून अजितदादांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. अजितदादा यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे सोपवणार याची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय होणार याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. शरद पवार आणि अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का ? अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती. आता अजितदादा यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. दिवंगत अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे काय याचीही चाचपणी पक्षात सुरु आहे. तर दुसरीकडे सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी सुचवले जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवावे अशी पक्षातील धुरिणींची भावना असल्याचे समजते.

खाती राष्ट्रवादीला मिळावीत

अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असावे याचा पेच सुटला नसताना आता राष्ट्रवादी काँग्रेस आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पत्रात अजितदादांकडे असलेली खाती राष्ट्रवादीला मिळावीत अशी मागणी केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता अजितदादांकडील खाती मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचा अर्थसंकल्प नजीक आला आहे. अजितदादांना सोबत घेत असताना अजितदादांच्या हट्टाने त्यांना त्यांच्या आवडीचे अर्थखात्ये देण्यात आले होते. आता त्यांच्या अकाली मृत्यूनंतर इतके महत्वाचे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:कडे राखतील असेही म्हटले जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0