तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Oct 7, 2025 - 14:34
 0  1
तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

भद्रावती (चंद्रपूर) : प्रशासनातील अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या एका शेतकऱ्याचा अखेर बळी गेला. मोरवा येथील शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (५५) यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान ११ दिवसांनी सोमवारी (दि. ६) पहाटे ३ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असून, संबंधित प्रकरणात निलंबित झालेले तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

मृत शेतकरी परमेश्वर मेश्राम आणि त्यांच्या वारसांची नावे न्यायालयाच्या आदेशानुसार गाव नमुना ७ मध्ये नोंदवणे बंधनकारक होते. मात्र, महसूल विभागाने मालकी हक्काबाबत वाद आहे, असे कारण सांगून आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली. दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित ठेवल्याने मेश्राम मानसिक तणावाखाली गेले. शेवटी त्यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयातच विष प्राशन केले. या घटनेनंतर महसूल विभागाने तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मेश्राम यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महसूल प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. 

पुरावे मिटविल्याचा तहसीलदारावर आरोप

विष प्राशनानंतर शेतकरी मेश्राम यांनी उलट्या केल्या. त्यांनी घेतलेल्या विषाची बाटली खाली पडली होती. मात्र, पुरावे सुरक्षित ठेवण्याऐवजी तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना सांगून घटनास्थळाची स्वच्छता करायला लावली, असा आरोप मोरवा येथील नागरिकांनी केला आहे.

"न्यायालयाच्या आदेशानंतरही वारसांची नोंद न केल्याने शेतकऱ्याने विष प्राशन केले. घरचा कर्ता माणूस गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोषी अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करणे पुरेसे नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक करावी."

"शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन केल्याप्रकरणी विभागीय चौकशी झाली. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू."

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0