Uddhav Thackeray : विदर्भ महाराष्ट्रापासून तुटणार? उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

Dec 12, 2025 - 19:49
 0  0
Uddhav Thackeray : विदर्भ महाराष्ट्रापासून तुटणार? उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

Vidarbha : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू आहे. राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि आमदार सध्या नागपूर मध्ये आहेत. गेल्या काही काळापासून वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करताना म्हटले होते की, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिले आहे. या समाजांच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. त्यामुळे या भागाला न्याय मिळालेला नाही. यासाठी वेगळा विदर्भ झाला पाहिजे.

वेगळा विदर्भ होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही कारण महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा आहे.’

हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातील आहेत. सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिता. कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात विदर्भासाठी कोणते प्रश्न मांडले हे वेगळा विदर्भ मागणाऱ्यांना सांगावे.’

लवकरात लवकर विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता
आज उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेत सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नेमण्याबाबत विनंती केली. याबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दोघांनीही सांगितले की आमच्या मनात याबाबत विचार सुरू आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ. गेल्या अधिवेशनातही त्यांनी असच म्हटलं होतं. त्यामुळे आता किती लवकर याबाबत निर्णय होतो ते पाहूयात. सभागृहात जनतेच्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी विरोधी पक्षनेता हवा असतो, त्यामुळे हे पद असणे आवश्यक आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0