सैन्यदलाच्या अधिकाऱ्याची विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, कारण काय? - ARMY OFFICER ATTACKS SPICEJET STAFF

Aug 4, 2025 - 10:41
 0  0
सैन्यदलाच्या अधिकाऱ्याची विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, कारण काय? - ARMY OFFICER ATTACKS SPICEJET STAFF

श्रीनगर : विमानतळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यानं विमान कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सैन्यदलाचा अधिकारी स्पाइसजेटच्या एसजी-386 या विमानानं श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला होता. संबंधित अधिकाऱ्याचं नाव अद्याप सार्वजनिक करण्यात आलेलं नाही.

नेमकी घटना काय? : विमान कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 26 जुलैची आहे. सैन्यदलाचा अधिकारी 16 किलो वजनाच्या दोन केबिन बॅगांसह विमानात चढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी चेक-इन दरम्यान त्याला रोखलं. प्रत्यक्षात, विमानात फक्त 7 किलो वजनाच्या केबिन बॅग नेण्याची परवानगी आहे.

ज्यादा पैसे दिल्यानं अधिकाऱ्याला राग आला : 7 किलोपेक्षा जास्त वजन वाहून नेण्यासाठी जादा पैसे द्यावे लागतात. ही माहिती कर्मचाऱ्यांकडून सैन्यदलाच्या अधिकाऱ्यालाही देण्यात आली. त्याला जादा पैसे देऊन चेक-इन पूर्ण करण्यास सांगण्यात आलं. पण तो यावर संतापला. सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करून त्यानं बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करताच जबरदस्तीनं एरोब्रिजमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

विमान कंपनीचे कर्मचारी गंभीर जखमी : यावेळी प्रवाशाला कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यानं तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. स्पाइसजेटनं सांगितलं की, त्यांचा एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला. परंतु आरोपी त्याला लाथा आणि ठोसे मारत राहिला. आरोपीनं इतर कर्मचाऱ्यांचे जबडे तोडले. एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणाही फ्रॅक्चर झाला. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्पाइसजेटनं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिलं : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पाइसजेटनं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सैन्यदलानं या घटनेची दखल घेतली आहे. स्पाइसजेटनं सांगितलं की, स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. विमान कंपनीनं नागरी उड्डयन नियमानुसार प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

विमान कंपनी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी : स्पाइसजेटनं केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात कंपनीच्या कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी संबंधित प्रवाशावर योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे. विमान कंपनीनं सांगितलं की, "या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज विमानतळ प्राधिकरणांकडून मिळवलं आहे. ते फुटेज पोलिसांना दिलं आहे. स्पाइसजेट आपल्या कर्मचाऱ्यांवरील कोणत्याही हिंसक कृत्याचा तीव्र निषेध करते. या प्रकरणात कंपनी कायदेशीर आणि नियामक कारवाई करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल," असंही स्पासईजेटच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

श्रीनगर विमानतळाचे संचालक काय म्हणाले? : दरम्यान, या घटनेबाबत 'ईटीव्ही भारत'नं श्रीनगर विमानतळाचे संचालक जावेद अंजुम यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सध्या या विषयावर बोलण्याचं टाळलं. त्यांनी सांगितलं की, "मी सध्या बाहेर आहे. त्यामुळे काही बोलू शकत नाही. श्रीनगरमध्ये परतल्यावर सविस्तर बोलणार आहे."

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0