भाजपाच्या दोन आमदारांनी यवतमध्ये दंगल पेटवली; संजय राऊतांचा गंभीर आरोप - SANJAY RAUT ON DEVENDRA FADANVIS

मुंबई : स्वतःला नव हिंदुत्ववादी समजणाऱ्या भाजपाच्या दोन आमदारांनी दौंडच्या यवतमध्ये दंगल पेटवली, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. "दौंडमध्ये हिंसाचार करणारे अर्बन नक्षलवादी भाजपाचेच होते. भाजपाचे दोन आमदार, जे स्वतःला नव हिंदुत्ववादी समजतात, ते यवतमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात, अशा वेळी फडणवीसांचा जनसुरक्षा कायदा काय करतो आहे? देवेंद्र फडणवीस हे अपयशी मुख्यमंत्री आहेत. जशी नरेंद्र मोदींच्या फुग्यात हवा भरली आहे, तशी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या फुग्यातही हवा भरलेली आहे", असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
आता फडणवीसांनी खोक्याची भाषा करू नये : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशावरही संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणाले, कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमध्ये असताना विधान भवनाच्या पायऱ्यांवर 'पन्नास खोके, एकदम ओके' ही घोषणा दिली, ती जगभर पोहोचली. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात गेले आहेत. ते काल म्हणाले, यंदाची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकेका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले गेले. सरकारी वाहनं, पोलिसांच्या वाहनातून पैशांचं वाटप झालं. आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार. त्यामुळे मला भाजपामध्ये यावं लागलं, असं ते म्हणाले. त्यामुळे फडणवीसांनी खोक्याची भाषा करू नये", अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं द्या : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीविषयी राहुल गांधी आणि त्यांची टीम अभ्यास करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या 100 जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली, हे राहुल गांधी वारंवार सांगत आहेत. निवडणूक आयोग या सगळ्यात सहभागी आहे. या 100 जागांवर घोटाळा झाला नसता, तर आज मोदी पंतप्रधान नसते. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीत हेच झालं. आता बिहारच्या निवडणुकीतही तेच होणार आहे. राहुल गांधी कधीच पुराव्यांशिवाय बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर बोलायला हवे. त्यांच्या भ्रष्ट मंत्रिमंडळात जी खोक्यांची ओढाताण सुरू आहे, त्यावर बोललं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोललं पाहिजे. उद्धव ठाकरेंमध्ये ते किती काळ अडकून पडणार? उद्धव-राज एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मराठीसाठी आम्ही हिंसाचार करणार : मनसैनिकांकडून सुरू असलेल्या तोडफोडीविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मराठी भाषेसाठी आम्ही हिंसाचार करणार आहोत. तुम्हाला काय करायचं ते करा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसांचं राज्य आहे. आमच्या 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करायला निघाला आहात. मुख्यमंत्रिपदी असल्यामुळे तुम्ही गप्प बसला आहात. ज्या दिवशी तुमचं हे पद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, याची जाणीव आम्हाला आहे. तुम्ही मोरारजी देसाई होणार आहात का? मराठीचा आग्रह धरतो म्हणून तुम्ही आमच्यावर गोळ्या झाडणार आहात का? आधी तुमच्या गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा, असे आव्हान संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिले.
फडणवीसांकडून महाराष्ट्र द्रोह्यांना पायघड्या : खासदार निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्रात संविधानिकरीत्या स्वागत करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी ते पायघड्या घालत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील खासदारांची चिंता नाही. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर थुंकणाऱ्यांची, महाराष्ट्र द्रोह्यांची चिंता त्यांना जास्त आहे. राज ठाकरेंनी कालच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अतिशय बरोबर आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून, हाकलून देणाऱ्या अल्पेश ठाकूरला भाजपानं आमदार केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणतात आम्ही आधी गुजराती आहोत. मग, आम्ही आधी मराठी नाहीत का? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले.
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर : उद्धव ठाकरे हे येत्या 6 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. तीन दिवस ते दिल्लीत आहेत. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात याविषयी चर्चा झाली आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
What's Your Reaction?






