'अनिल परबांनी मुद्दा उचलण्याआधीच 'सावली बार'चं लायसन्स जमा' : रामदास कदमांनी दिला इशारा - RAMDAS KADAM ATTACK ON ANIL PARAB

Aug 3, 2025 - 16:59
 0  0
'अनिल परबांनी मुद्दा उचलण्याआधीच 'सावली बार'चं लायसन्स जमा' : रामदास कदमांनी दिला इशारा - RAMDAS KADAM ATTACK ON ANIL PARAB

मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं असलेल्या सावली बारच्या परवान्यावरून उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी कदम कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं असून, "अनिल परबांनी आरोप करण्याआधीच संबंधित बारचं लायसन्स उत्पादन शुल्क विभागाकडं जमा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. "आम्ही 13 तारखेला लायसन्स जमा केलं आणि अनिल परबनं 18 ला विधिमंडळात विषय काढला", असं रामदास कदम माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

करारनामा दाखवत खुलासे : रामदास कदम यांनी करारनामा दाखवत सावली बारबाबत काही खुलासे केले. ते म्हणाले, "आम्ही हॉटेल शरद शेट्टींना चालवायला दिलं होतं. करारनाम्यातील कॉलम 6 मध्ये असं म्हटलं आहे की, कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. कॉलम 7 मध्ये म्हटलंय की काही गैरकृत्य झाल्यास व्यवसाय चालवणारे जबाबदार असतील. मालकाची जबाबदारी राहणार नाही. तिथं हॉटेल व्यवसायाव्यतिरिक्त अन्य गोष्टी आढळल्यानं आम्ही तत्काळ त्याला बाहेर काढलं आणि दोन्ही लायसन्स तेव्हाच जमा केले. आम्ही लायसन्स 13 तारखेला जमा केले आणि अनिल परबनं 18 ला विधिमंडळात विषय काढला. या हॉटेलचा आणि गृह राज्यमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याचा विषयच येत नाही. नियमबाह्य पद्धतीनं यांनी हे विषय विधानमंडळात काढले आहेत. हे आरोप तत्काळ कामकाजातून काढून टाकावेत, असा अर्ज आम्ही सभापतींना दिला," असं रामदास कदम यांनी सांगितलं.

पोलिसांनी रचला कट : "उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत. पण, कावळ्यानं कितीही काव काव केली, तरी आम्ही त्याची दखल घेत नाही. डान्सबार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत," असं कदम म्हणाले. मनसेनं केलेल्या नवीमुंबई आणि रायगडमधील डान्सबारच्या तोडफोडीविषयी विचारलं असता, रामदास कदम म्हणाले, "त्यांचं खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्रात जिथं जिथं लेडिज बार असतील, ते सर्व साफ करून टाका, असं मी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना सांगितलं आहे. वाशीमध्ये योगेश यांनी लेडिज बार बंद केला, म्हणून हे सर्व घडलं आहे. काही पोलिसांनी योगेशला फोन केले होते, हे तुम्ही थांबवा, पण त्यांनी थांबवलं नाही. म्हणून हेतुपुरस्सर योगेश कदम यांना बदनाम करण्यासाठी काही पोलिसांनी केलेलं हे कारस्थान आहे. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. हे पोलीस कोण आहेत, याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत," असंही रामदास कदम यांनी सांगितलं.

अनिल परब यांना इशारा : रामदास कदम म्हणाले, "मी सर्वच पत्ते उघड करणार नाही. पण आमच्या अंगावर जे चालून आले, त्यांच्यावर नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे, कोणालाही सोडलेलं नाही. जे आमच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना भविष्यात उत्तर मिळेल," असा इशारा कदम यांनी अनिल परब यांना दिला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0