अंडी बाहेर न काढू शकणाऱ्या कासवावर यशस्वी उपचार, भारतात पहिल्यांदाच झाली 'लॅप्रोस्कोपीक एग-बाइंडिंग' शस्त्रक्रिया - LAPAROSCOPIC EGG BINDING SURGERY

पुणे : शहरातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये एक ऐतिहासिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 'लॅप्रोस्कोपिक एग-बाइंडिंग' असं या शस्त्रक्रियेचं नावं आहे. या शस्त्रक्रियेमध्ये, कासवाच्या पोटात अडकलेली 4 पूर्ण विकसित अंडी यशस्वीरित्या बाहेर काढली गेली, ज्यामुळे कासवाला जीवनदान मिळालं आहे. विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
कासवाला 1-2 महिन्यांपासून आरोग्याच्या समस्या होत्या : श्री नावाच्या मादी कासवाला गेल्या 1-2 महिन्यांपासून विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. या कासवाला क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम, यकृताच्या आकारामध्ये वाढ आणि हिमोग्लोबिनची कमतरता होती. अशा परिस्थितीत, पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये तिच्यावर यशस्वी 'लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया' करण्यात आली. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, ज्यात 4 पूर्ण विकसित अंडी बाहेर काढण्यात यश आलं आहे.
कासव सुस्त झाल्यानं पालकांची चिंता वाढली : श्री कासव नेहमी अॅक्टिव्ह असायची. पण तिचं अचानक सुस्त होणं आणि आहार सेवन थांबवणं तिच्या पालकांसाठी चिंतेचा विषय बनलं. तळेगावजवळील सोमाटणे येथील नामदेव यांना श्रीच्या पोटाच्या भागात सूज आल्याचं दिसलं. कासव अंडी बाहेर ढकलण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु ते तिला अवघड जात होते. अशा स्थितीत, श्रीला पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं.
क्लिनिकमध्ये चाचणीनंतर नेमकी समस्या समोर आली : कासवाला क्लिनिकमध्ये नेल्यावर काही चाचण्यांद्वारे ‘एग बाइंडिंग’ (अंडी बाहेर काढू न शकणे) चा त्रास असल्याचं स्पष्ट झालं. या स्थितीत, कासव नैसर्गिकरित्या अंडी बाहेर काढू शकत नाहीत. अल्ट्रासाऊंड चाचणीमध्ये तिच्या यकृतामध्ये वाढ दिसून आली, तसेच पूर्णपणे तयार झालेली अंडी देखील आढळली. रक्त चाचण्यांमध्ये कासवामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्याचं दिसून आलं. सुरुवातीला, एपिडोसिन इंजेक्शननं अंडी बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु ते अयशस्वी ठरले. कासव अशक्त झाल्यानं तिला हातानं खायला देण्यात आलं आणि तिच्या आरोग्याचं बारकाईनं निरीक्षण करण्यात आलं.
डॉक्टरांनी काय सांगितलं? : द स्मॉल अॅनिमल क्लिनिकमधील पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांनी सांगितलं की, "श्रीची शस्त्रक्रिया 21 जुलै रोजी लॅप्रोस्कोपीक पद्धतीचा वापर करून केली गेली, जी अत्यंत सुरक्षित पद्धत आहे. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान तिला आरामदायी ठेवण्यासाठी काळजीपूर्वक इंट्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली. तिचं वजन 1.5 किलो होतं आणि तिला उबदार ठेवण्यासाठी खाली एक हीटिंग पॅड देखील ठेवण्यात आला."
शस्त्रक्रिया करून अंडी काढण्यात आली : शस्त्रक्रियेदरम्यान, गर्भाशयाच्या जवळ एका लहान छिद्र पाडून अंडाशयात (फॅलोपियन ट्यूब) हळूवारपणे प्रवेश केला गेला आणि 4 पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली. त्यानंतर, अंडाशय देखील काढून टाकण्यात आलं. यानंतर श्री एका तासातच बरी झाली. सहसा, अशा प्रकरणांमध्ये अंडी काढण्यासाठी कवच कापावे लागते, परंतु या प्रकरणात डॉ. परदेशी यांनी प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया केल्यामुळे कवच वाचविता आले आणि संसर्गाचा धोका टळला.
भारतातील पहिली लॅप्रोस्कोपीक एग-बाइंडिंग शस्त्रक्रिया : विशेष म्हणजे, ही भारतातील पहिली लॅप्रोस्कोपीक एग-बाइंडिंग शस्त्रक्रिया होती, ज्यात सेव्होफ्लुरेन गॅस ऍनेस्थेसियासह GE 620 केअरस्टेशनचे यांत्रिक व्हेंटिलेशन वापरलं गेलं. डॉ. परदेशी म्हणाले, "शस्त्रक्रियेनंतर आम्हाला श्रीच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. ती सक्रिय आणि उत्साही वाटू लागली. आम्ही तिची हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी तिला आळीपाळीने मल्टीविटामिन आणि आयर्नचे इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. तसेच, तिला बरं होण्यासाठी तोंडावाटे पोषक आहार देण्यात आला. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी अँटीसेप्टिक मलम लावण्याचा सल्ला दिला."
कासवाच्या प्रकृतीत लक्षणनीय सुधारणा : शस्त्रक्रियेनंतर श्रीच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली आहे. तिच्या शारीरिक हालचालींमध्ये आणि खाण्याच्या सवयींमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे आणि जेवू लागली आहे. शस्त्रक्रियेनंतर पूर्ण एका तासाच्या आत ती बरी झाली आणि तिला घरी सोडण्यात आलं. श्रीच्या पालक नामदेव यांनी सांगितलं की, "श्रीला वेदना होत असल्यानं ती नीट खाऊ किंवा हालचाल करू शकत नसल्याचं पाहून आम्हाला खूप भीती वाटली होती. तिला या त्रासातून मुक्त केल्याबद्दल आम्ही संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो. श्री आता पुन्हा सक्रिय झाली आहे आणि जेवू लागली आहे."
What's Your Reaction?






