मोठी बातमी : भुजबळांचा बहिष्कार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ
ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप, पक्षात तातडीची बैठक मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांच्या या नाराजीमुळे पक्षातील हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तातडीची बैठक
भुजबळांच्या नाराजीनंतर पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी पुढील पावले काय असावीत, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले,
“भुजबळ साहेब बैठकीत का आले नाहीत, याची कल्पना नव्हती. सरकारने कालच जीआर जारी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, पण त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे. दोन दिवसांत यावर स्पष्टता येईल.”
तटकरे यांनी पक्षात एकजूट असल्याचे स्पष्ट केले.
प्रकाश शेंडगे यांचा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी इशारा दिला आहे की,
“सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. ओबीसींच्या थाळीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास आम्ही विरोध करू. राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू आहे. तसेच, आम्ही न्यायालयातही लढाई लढणार आहोत.”
पुढील वाटचालीकडे लक्ष
सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भुजबळांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून पुढील बैठकीत कोणते निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0