हिदायतुल्ला पटेल यांचा मारेकरी न्यायालयीन कोठडीत रवाना…महम्मद बद्रुज्जमा याच्या अटकपूर्व जामीनावर दि.२३ जानेवारी रोजी युक्तिवाद…
दि ६ जानेवारी २०२६ रोजी प्राणघातक हल्ल्यात घायाळ झालेल्या हिदायतुल्ला पटेल यांच्या मृत्यूपूर्वीच आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या मारेकर्यास पोलीस कोठडी संपल्यानंतर आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी केली आहे.
तर याच प्रकरणी संशयित आरोपी असलेला महम्मद बुद्रुज्जमा याचे अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी टळली असून येणाऱ्या २३ जानेवारी रोजी ही सुनावणी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल यांचेवर ६ जानेवारी रोजी घातक हल्ला झाला होता. त्यांचेवर उपचार करण्याचे दरम्यान दि.७ जानेवारी रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्राणांतिक हल्ल्याचे आरोपाखाली पटेल यांचेच गावातील उबेद पटेल राजीक उर्फ कालू पटेल या तरुणास आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यास आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आकोट न्यायालयाने ऊबेदचे कोठडीत वाढ करून त्याला पुन्हा १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवण्याचा आदेश दिला. ही मुदतही संपल्यावर त्याला आकोट न्यायालयात पुन्हा हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.
याच दरम्यान याच प्रकरणातील संशयित आरोपी क्रमांक एक महंमद बुद्रुज्जमा याने दि. १४ जानेवारी रोजी अटकपूर्व जामिन मिळणे करिता आकोट न्यायालयात दाद मागितली होती.
आकोट न्यायालयाने १६ जानेवारी रोजी ह्या जामीन अर्जावर सुनावणी ठेवली होती. मात्र ह्या दिवशी आरोपीचे वकील सत्यनारायण जोशी आणि अकोला जिल्हा सरकारी वकील गिरीश देशपांडे हे हजर न राहिल्याने ही सुनावणी टळली आहे. ही सुनावणी पुन्हा २३ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणातील फिर्यादीने महम्मद बद्रुज्जमा याचे अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप नोंदविला आहे. या सोबतच आरोपीचे मार्फतही एक केस लॉ या प्रकरणात प्रस्तुत केल्याची खबर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “अशा प्रकरणात संशयित म्हणून नावे असलेल्या आरोपी संदर्भात कोणताही पुरावा आढळून न आल्यास संशयीतास जामीन देता येतो.” असे ह्या केस लॉचे स्वरूप आहे. संयोगाची बाब ही आहे की, सन २०१९ साली मोहाळा येथे एक मारहाणीचे प्रकरण घडले होते.
त्यावेळी मतीन पटेल ह्या इसमाचा मृत्यू ओढवला होता. हा मृतक ईसम पटेल यांचा मारेकरी उबेद पटेल याचा चुलता होता. त्याचे मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी म्हणून फिर्यादीमध्ये हिदायतुल्ला पटेल यांचेही नाव गोवण्यात आले होते.
त्यावेळी पटेल यांचे मदतीकरिता हाच केस लॉ धावून आला होता. ह्याचेच आधारावर त्यावेळी पटेल यांना अटकपूर्वक जामीन मंजूर केला गेला होता. नियतीचा खेळच असा न्यारा की, आता हिदायतुल्ला पटेल यांच्या हत्येतील संशयित आरोपीच्या अटकपूर्व जामीना करीता त्याच केस लॉचा आधार मिळणार आहे.
हा केस लॉ इतका स्वयं स्पष्ट आहे की, त्याचे आधारावर पटेल हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना हमखास जामीन मिळणार असल्याची न्यायालय परिसरात चर्चा होती. त्यामुळे २३ जानेवारी रोजी महम्मद बद्रुज्जमा याचे बाबत काय निकाल लागतो याकडे सर्व संबंधितांच्या नजरा लागल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0