पतीला सोडून प्रेमीसोबत... दरवाज्याला कडी लावून! महिलेचा मृतदेह घरात
अमरावती : शहरातील राहुलनगर भागातील एका भाड्याच्या खोलीत महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. या संशयास्पद मृत्यू प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून तिच्या लिव्ह-इन पार्टनर सुभाष अजाबराव वानखडे (४०, रा. नेरपिंगळाई, मोर्शी, सध्या राहणार – राहुलनगर) याच्यावर खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेचे नाव कविता सुभाष वानखडे उर्फ कविता नागेश पिल्लारे (४५) असे असून, ती राहुलनगर परिसरात राहत होती. फिर्यादीत तिचा भाऊ रितेश रमेश ठाकरे (३७, रा. मेटीखेडा, ता. कळंब, जि. यवतमाळ) याने तक्रार नोंदवली आहे.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता कविता ही स्वतः राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत मृतावस्थेत सापडली. शवविच्छेदनात तिचा मृत्यू हल्ल्यातून (असॉल्ट) झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात पार्थिव देण्यात आले व अंतिम संस्कार पार पडले.
२७ सप्टेंबर रोजी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी सुभाष घटनेपासून फरार आहे. त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती ठाणेदार रोशन सिरसाट यांनी दिली.
सततचे वाद, बाहेरून लावलेला दरवाजा
मृत महिलेच्या भावाने सांगितले की, कविता व सुभाष हे पती-पत्नी असल्याप्रमाणे एकत्र राहत होते. मात्र त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी खोलीचा दरवाजा बाहेरून लावलेला होता आणि त्यानंतर सुभाष तेथे परतला नाही. यामुळेच त्याच्यावर संशय घेऊन तक्रार दिली असल्याचे स्पष्ट झाले.
पूर्वी दाखल होती मिसिंगची तक्रार
कविता यांचे पहिले लग्न नागेश पिल्लारे (रा. तळेगाव दशासर) यांच्याशी झाले होते. मात्र २७ जून रोजी त्या घर सोडून गेल्याने नागेश यांनी पोलिसांत मिसिंगची नोंद केली होती. त्यानंतर कविता या सुभाषसोबत राहू लागल्या. २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची माहिती नागेश यांनी भावाला दिली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0