शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया यांच्याविरुद्ध वॉरंट जारी - ANJALI DAMANIA

धुळे - माजी महसूल मंत्री तथा तत्कालिन भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात सन २०१६ मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तसंच आम आदमी पक्षाच्या माजी सदस्य अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे.
या प्रकरणात शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद अॅड. अमित जैन आणि अॅड. सुधाकर पाटील यांच्या मार्फत १२ ऑगस्ट २०१६ रोजी दाखल करण्यात आली होती.
सन २०१६ मध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदांद्वारे आणि विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आ. एकनाथ खडसे यांच्याविरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर तसंच तालुक्यातही भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, हेमराज राजपूत, रोहित शेटे, निलेश महाजन, नितीन माळी अशा साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला. सदर प्रकरणात आज सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बी डब्लू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिलेत. आता 23 सप्टेंबर पर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 सप्टेंबर 2025 रोजी आहे.
What's Your Reaction?






