विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून आदित्य ठाकरेंची मर्सिडीजवरून घोषणा, नीलम गोऱ्हेंचा एक कटाक्ष अन्…
महाविकास आघाडीचे आमदार आंदोलन करत असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तिथे दाखल झाल्या. यावेळी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

राज्यात नवं सरकार स्थापन होऊन दुसरं अधिवेशन सुरू झालं आहे. ३० जूनपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून अद्याप विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. महाविकास आघाडीला हे पद मिळावं यासाठी मविआतील विविध पक्षांचे आमदार सातत्याने मागणी करत आहेत. मविआतील नेत्यांनी आतापर्यंत अनेक वेळा विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भात पत्र देखील लिहिली आहेत. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आज पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी शिवसेना (ठाकरे) अधिक आक्रमक झाली आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करत थेट विधीमंडळाबाहेर आंदोलन केलं.
दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात सरकारतर्फे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी थेट सरन्यायाधीशांपुढे आंदोलन केलं. सरन्यायाधीश विधीमंडळात दाखल झाले त्यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘न्याय द्या, न्याय द्या’, चीफ जस्टीस न्याय द्या’ अशा घोषणा करत विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेसह (ठाकरे) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदारही बसले होते. हातात पोस्टकार्ड्स घेऊन आणि घोषणा देत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली.या आंदोलनावेळी घडलेल्या आणखी एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं. सर्व आमदार घोषणा देत असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तिथे दाखल झाल्या. यावेळी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (ठाकरे) आमदारांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘मर्सिडीज ओके’, अशा घोषणा दिल्या. यावेळी दरवाजातून आत प्रवेश करत असलेल्या नीलम गोऱ्हे थांबल्या. त्या मागे वळल्या आणि त्यांनी सर्व आंदोलकांवर व आदित्य ठाकरेंवर रागाने कटाक्ष टाकला. त्यानंतर त्या आत गेल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.या आंदोलनावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधीमंडळात दाखल झाले. पायऱ्यांवरून पुढे जाताना ते थांबले आणि त्यांनी सर्वांच्या घोषणा ऐकल्या. तेव्हा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव बावनकुळे यांना म्हणाले, “तुम्ही देखील आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू”. हे ऐकून बावनकुळे खळखळून हसले आणि विधीमंडळात गेले. तसेच पाठोपाठ आमदार नितेश राणे देखील विधीमंडळात दाखल झाले. यावेळी मविआ आमदारांनी ‘या कोंबडी चोराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा दिल्या. नितेश राणे यावर प्रतिक्रिया न देता थेट विधीमंडळाच्या इमारतीत गेले.
What's Your Reaction?






