ढगफुटीनंतर अचानक आला भयंकर पूर; काही क्षणातच बाजारपेठ पाण्यात , चार जणांचा मृत्यू - CLOUD BURST IN UTTARKASHI

उत्तरकाशी - उत्तराखंड हे पर्यटन आणि चार धाम यात्रेमुळे प्रसिद्ध असलेलं राज्य पूरस्थितीतमुळे संकटात सापडलं आहे. आज अचानक ढगफुटीनंतर धारली गावातील खीरगंगा नदीला पूर आल्यानं पुराचे पाणी अनेक हॉटेलमध्ये शिरलं आहे. पुराच्या पाण्यासोबत घरे आणि दुकानांमध्येही कचरादेखील शिरला आहे. पुरामुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
धारली खीरगंगा येथे पाण्याची पातळी वाढल्यानं धारली बाजारपेठ परिसरात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले, पुरानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवरून बोलून धारली येथील नुकसानीची माहिती घेत मदतीचं आश्वासन दिलं आहे.
मदत आणि बचावासाठी सैन्य रवाना: धारली येथे पूर परिस्थिती एवढी गंभीर आहे की सैन्यही मदत आणि बचाव कार्यासाठी रवाना झालं आहे. भटवाडी येथील एसडीआरएफ पथकही धारलीत स्थानिकांच्या मदतीसाठी रवाना झालं आहे. उत्तरकाशीतील धारली हा गंगोत्री धामचे मुख्य ठिकाण आहे. धारली येथे खीरगंगा नदीत विनाशकारी पूर आल्यानं २५ हून अधिक हॉटेल आणि होमस्टे यांचे प्रचंड नुकसान झाल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं. काही लोक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारपेठ उद्धवस्त- खीर गंगा नदीच्या वरच्या भागात ढग फुटी होताच विनाशकारी पूर आला. काही वेळातच पुरानं धारली बाजारपेठेला वेढलं. ढिगाऱ्यांसह असलेले पुराचे पाणी वेगानं आल्यानं लोकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. यावेळी धारली बाजारपेठेच्या वरती उपस्थित असलेले लोक मदतीसाठी ओरडत होते. काही क्षणातच, खीर गंगेच्या काठावरील सुंदर धारली बाजारपेठ उद्धवस्त झाली.
गंगोत्रीचे आमदार डेहराडूनहून रवाना: धारली येथील खिरगढवर ढगफुटी झाल्यामुळे धारली गावाखालील भागात पाणी साचल्याचं गंगोत्रीचे आमदार सुरेश चौहान यांनी सांगितलं. जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आलं आहे. हर्षिल येथून सैन्यदलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. गढवाल आयुक्त आणि मुख्य सचिवांनाही कळवण्यात आलं आहे. जिल्हादंडाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचत आहेत. .
बनाल पट्टीमध्येही मुसळधार पाऊस: उत्तरकाशी जिल्ह्यातील बारकोट तहसील परिसरातील बनाल पट्टीमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे मोठ्या संख्येने शेळ्या ओढ्यात वाहून गेल्या आहेत.
What's Your Reaction?






