अमरावती पोलिसांचा मोठा धडाका : आंतरराज्यीय घरफोडी टोळी ‘ट्रॅप’; तब्बल २७ प्रकरणांचा उलगडा
अमरावती गुन्हे शाखेने आंतरराज्यीय घरफोडी टोळीला अटक करत तब्बल २७ प्रकरणांचा उलगडा केला. २१ लाखांचा मुद्देमाल जप्त; महिला न्यायाधीशांच्या घरफोडीचा खुलासा.
अमरावती : शहर गुन्हे शाखेने शनिवारी मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. या चार आरोपींकडून तब्बल २७ घरफोड्यांचे गुन्हे उघड झाले असून २१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अटक आरोपींनी महिला न्यायाधीशांच्या घरात झालेल्या चोरीची कबुली दिल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांत अमोल पाटील (३२), सागर देवरे (३०) — दोघेही जामनेर (जि. जळगाव), निखिल उर्फ पिस्तुल पाटील (२४, मांडळ, अमळनेर, जळगाव) आणि मिलिंद खैरनार (२९, नोळवा, पळसाना, सुरत) यांचा समावेश आहे.
महिला न्यायाधीशांच्या निवासस्थानी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख मिळून ९ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपींचा शोध घेतला. अखेर ४ ऑक्टोबर रोजी ही टोळी अमरावतीत आणण्यात आली. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
चारही आरोपी जळगाव व सुरत येथील आंतरराज्यीय टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने सुमारे दहा दिवस जळगाव आणि सुरत भागात पाळत ठेवल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने अटक करणे आव्हानात्मक ठरले होते, तरीही पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश इंगोले व मनीष वाकोडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0