'माझ्या वाक्याचा विपर्यास...'; नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं वादग्रस्त वक्तव्यावरून स्पष्टीकरण - MINISTER DATTATRAY BHARNE

Aug 5, 2025 - 19:28
 0  1
'माझ्या वाक्याचा विपर्यास...'; नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं वादग्रस्त वक्तव्यावरून स्पष्टीकरण - MINISTER DATTATRAY BHARNE

पुणे : राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं भाषण सध्या वादाचा विषय बनलं आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात एक वादग्रस्त विधान केलं होतं, ज्यावर विरोधकांनी तीव्र टीका केली. त्यानंतर कृषिमंत्री भरणे यांनी त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

भरणे यांचं नेमकं वक्तव्य काय होतं? : दोन दिवसांपूर्वी, इंदापूर येथे महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणेंनी म्हटलं की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” त्यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसंच, त्यांच्या या वाक्याचा नेमका अर्थ काय यावरून उलट-सुलट चर्चा रंगली होती.

'शब्दाचा विपर्यास केला गेला' : आता भरणे यांनी स्पष्ट केलं, "माझ्या त्या दिवशीच्या भाषणात जे काही म्हटलं, त्यात मला म्हणायचं होतं की, अधिकारी आणि शेतकऱ्यांचं नातं हे असं असावं की समोरचा व्यक्ती घरच्या माणसासारखा वाटावा." ते म्हणाले, 'वाकडं काम' हा शब्द गावातील बोली भाषेतील एक सामान्य शब्द आहे आणि त्याचा विपर्यास केला गेला आहे. कृषिमंत्री भरणे आज (4 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना हे स्पष्टीकरण दिलं.

भरणेंनी कर्जमाफी संदर्भात काय सांगितलं? : दत्तात्रय भरणे यांनी कृषिमंत्री पद दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. शेतीशी असलेल्या आपल्या लहानपणापासूनच्या नात्याचा उल्लेख करत, त्यांनी कृषिमंत्री पद स्वीकारल्यानंतर या विभागातील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला. कर्जमाफी संदर्भात विचारलं असता, भरणेंनी सांगितलं की, पदभार स्वीकारल्यानंतर या विषयाचा आढावा घेऊन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. त्यांनी पुढं सांगितलं की, माहिती घेतल्याशिवाय ते काही बोलणार नाहीत आणि सर्व माहिती मिळवल्यानंतरच या विषयावर अधिक चर्चा केली जाईल.

'मी सिद्धगड बंगल्यातच राहणार' : माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला अजूनही सोडलेला नाही, याबाबत दत्तात्रय भरणे यांना विचारलं असता, त्यांनी उत्तर दिलं की, शासनानं त्यांना सिद्धगड बंगला दिला आहे. त्यांचा बंगला त्यांच्यासाठी चांगला आहे आणि ते त्यातच राहणार आहेत. भरणेंनी स्पष्ट केलं की, त्यांचा बंगला ते कायम ठेवणार आहेत.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबतही दत्तात्रय भरणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मी जे भाषण केलं, त्याचा पूर्ण सारांश तुम्ही ऐका, त्यात मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. माझ्या बोली भाषेचा विपर्यास केला गेला." भरणेंनी स्पष्ट केलं की, अधिकाऱ्यांनी लोकांची अडचण करु नये, यासाठीच त्यांनी ते वक्तव्य बोली भाषेत केलं होतं, पण त्याचा विपर्यास केला गेला. भरणे पुढे म्हणाले, "संजय राऊत हे मोठे नेते आहेत, मी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. त्यांना महत्त्व द्यायचं कारण नाही. शेतकऱ्यांसाठी जे गरजेचं आहे, ते आम्ही करू. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी चुकणारा माणूस नाही. मी खूप समंजस माणूस आहे आणि मी असं वक्तव्य करणार नाही."

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0