पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाचा खून, पाच हल्लेखोरांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

पुण्याच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वर्दळ असलेल्या पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर लाथा बुक्या आणि दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला.

Jun 17, 2025 - 16:50
 0  0
पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाचा खून, पाच हल्लेखोरांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या पुण्यातील पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर आदिवासी तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. लाथा बुक्यांनी मारहाण आणि दगडाने ठेचून आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर दुचाकीवरून आलेले सर्व हल्लेखोर फरार झाले. रोहिदास काळुराम काटकर ( वय २४, रा.कादवे, ता. राजगड) असे मयत युवकाचे नाव आहे‌. या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी कातकरी समाजावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच अज्ञात हल्लेखोरां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

हा प्रकार काल रविवारी (१५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर घडला. मयत रोहिदास काळुराम काटकर आणि मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे दोघे जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हाँटेल समोर उभे होते ‌‌ . त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेले 20 ते 25 वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अचानक लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांनी जोरदार प्रहार केले. त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठा दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला, त्यात रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात विजय जाधव हा पण जखमी झाला.

वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी मयत रोहिदास काटकर याचा भाऊ अविनाश काटकर याने वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगंळ यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास करत आहेत. पानशेत पोलीस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील, युवराज सोमवंशी, ज्ञानदीप धिवार आदी पोलिस जवानांसह वेल्हे व ग्रामीण पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पोलिसांपुढे मोठे आव्हान

रात्रीच्या सुमारास घटना घडल्याने तसेच खूनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याने पोलीसांपुढे गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. पानशेत बाजारपेठ, पानशेत वसाहत तसेच पुणे -पानशेत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोर दुचाकी गाड्यावरुन आले होते तसेच ते त्याच गाड्यावरून फरार झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, असे पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील यांनी सांगितले. ‌

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0