IND vs ENG: टीम इंडियात ‘या’ खेळाडूची होणार ‘सरप्राईज एन्ट्री’, इंग्लंडविरूद्ध मालिकेसाठी बुमराहच्या जागी मिळणार संधी?
भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. य सामन्यापूर्वी टीम इंडियात अचानक गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे.

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २० जूनपासून या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे आता भारतीय संघात एका नव्या युगाला सुरूवात झाली आहे. रोहित शर्मानंतर आता शुबमन गिलच्या खांद्यावर संघाती जबाबदारी देण्यात आली आहे. तर संघातही मोठी बदल आहेत, त्यामुळे आता प्लेईंग इलेव्हन कशी असणार यावर चर्चा सुरू आहेत. यादरम्यान एक नवा गोलंदाज संघात दाखल झाला आहे.
भारताच्या सिनियर संघापूर्वी भारताचा अ संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. जिथे या संघाने २ अनऑफिशियल कसोटी सामने खेळले होते. या अ संघातील एक खेळाडू आता भारतीय संघात दाखल झाला आहे. या खेळाडूबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार हा खेळाडू भारतीय सिनियर संघाबरोबर थांबणार आहे.
बीसीसीआयने इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला तेव्हा त्यात १८ खेळाडूंचा समावेश होता. आता या संघात हर्षित राणाला अचानक संघात प्रवेश देण्यात आल्याचे वृत्त रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. भारताच्या अ संघाबरोबर हर्षित मायदेशी परतणार नसून तो इंग्लंडमध्येच थांबणार आहे.
हर्षित राणा इंग्लंडमध्ये थांबल्याने भारताचं वेगवान गोलंदाजी युनिट आणखी मजबूत झालं आहे. संघात आधीच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी आहेत. आता पहिल्या कसोटीत कोणत्या गोलंदाजांना संधी देणार हे पाहावं लागणार आहे. भारताच्या अ संघाकडून खेळताना गोलंदाज अंशुल कंबोजने चांगली गोलंदाजी केली होती. पण त्याच्याऐवजी हर्षितला इंग्लंडमध्ये थांबायला सांगितल्याने टीकादेखील केली जात आहे.
जसप्रीत बुमराह या मालिकेत पाच सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाहीये. तो दोन ते तीन सामने खेळेल. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यावर जर हर्षित राणाचा संघात समावेश केला तर त्याला संधी दिली जाऊ शकते. हर्षितने नुकतेच ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत हर्षितने दोन कसोटी सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. तर भारत अ संघाकडून खेळताना हर्षित फक्त एकच विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
What's Your Reaction?






