यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी! अवघ्या इतक्या धावा करताच द्रविड- सेहवागला टाकणार मागे

भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Jun 17, 2025 - 16:12
Jun 17, 2025 - 16:24
 0  0
यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी! अवघ्या इतक्या धावा करताच द्रविड- सेहवागला टाकणार मागे

हेडिंग्लेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे असणार आहे. रोहित शर्मा नसल्यामुळे सलामीला फलंदाजीला येणाऱ्या यशस्वी जैस्वालकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा आहे. यादरम्यान जैस्वालकडे कसोटी क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

यशस्वी जैस्वालचा दमदार रेकॉर्ड

यशस्वी जैस्वालने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या १९ सामन्यातील ३६ डावात ५२.८८ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं आणि १० अर्धशतकं झळकावली आहेत. जैस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांजवळ पोहोचला आहे. त्याने पुढील ३ डावात जर २००० धावांचा पल्ला गाठला, तर मोठ्या रेकॉर्डमध्ये तो वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडला मागे सोडू शकतो. आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवागने ४० डावात २००० धावांचा पल्ला गाठला होता.

मात्र, हा रेकॉर्ड मोडणं यशस्वी जैस्वालसोबत मुळीच सोपं नसेल. कारण तो पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडची परिस्थिती आणि दबाव हा यशस्वीसाठी नवीन असेल. तो हा दबाव हाताळून कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध झालेल्या अनधिकृत सराव सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट शांत राहिली. सराव सामन्यातील ४ डावात त्याला एक केवळ १ अर्धशतक झळकावता आलं आहे. यशस्वीला साथ देण्यासाठी केएल राहुल सलामीला येऊ शकतो. राहुलने इंग्लंड लायन्सविरूद्ध दमदार शतकी खेळी करत सुरूवात केली होती. त्यानंतर इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली.

परदेशात कशी आहे यशस्वी जैस्वालची कामगिरी?

यशस्वी जैस्वालने परदेशात दमदार कामगिरी केली आहे. बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत डावाची सुरूवात करताना त्याने दमदार शतकी खेळी केली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील १० डावात त्याने ४३.४४ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि २ अर्धशतकं झळकावली होती. जर भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल, तर जैस्वालने चांगली सुरूवात करून देणं गरजेचं असणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0