अंबानगरीची हिरवी ओळख’ जपली – स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती देशात अव्वल

Sep 13, 2025 - 12:45
Sep 13, 2025 - 12:46
 0  10
अंबानगरीची हिरवी ओळख’ जपली – स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती देशात अव्वल

अमरावती | २०२५ च्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती शहराने देशभरात चमकदार कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले. नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी स्वीकारला.

द्वितीय श्रेणीतील (३ ते १० लाख लोकसंख्या) शहरांच्या गटात अमरावतीने परिपूर्ण २०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. यासोबतच ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देखील शहराला मिळाले असून, यामुळे अमरावतीकरांचा अभिमान द्विगुणित झाला आहे.

हिरवाईमुळे ‘स्वच्छ हवा’

‘अंबानगरीची हिरवी ओळख’ हे यशाचे खरे गमक मानले जात आहे. शहरात तब्बल १५ लाख वृक्षांची नोंद आहे. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर, वन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्त्यांच्या दुतर्फा लागवड, दुभाजकावरील हिरवळ, तसेच घरगुती वृक्षसंवर्धन यांचा समावेश आहे. सध्या अमरावती महानगरात ११० उद्याने असून, शिवटेकडी, वडाळी गार्डन यांसारखी हरित ठिकाणे शहराला वेगळं रूप देतात.

सर्वेक्षणात लक्ष केंद्रीत केलेले मुद्दे

सर्वेक्षणात प्रामुख्याने रस्त्यांची बांधणी व स्वच्छता, रोड डिव्हायडरवरील हरित पट्टा, घनकचरा संकलन व प्रक्रिया, बांधकाम कचरा व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन, डोअर टू डोअर कचरा संकलन या बाबींवर भर देण्यात आला. अमरावतीत दररोज जवळपास ३०० टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. प्रक्रियेनंतर २७ हजार टन साहित्य सिमेंट कंपन्यांना देण्यात आले आहे.

हवा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न

  • वाहन तपासणीसाठी पीयूसी सेंटर

  • सार्वजनिक वाहतूक सुविधा

  • पेट्रोल पंप व एलपीजी कनेक्शन तपासणी

  • वायू प्रदूषण मॉनिटरिंग स्टेशन

  • २४ तास वीजपुरवठा

  • जनजागृती मोहिमा

याशिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण मंडळ आणि नागपूर निरी टीमने तपासणी करून अहवाल सादर केला होता.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0