अमरावतीत 400 उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे | अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा ऐतिहासिक सोहळा
अमरावतीत राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत अनुकंपा तत्त्वावरील आणि MPSC निवड झालेल्या 400 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित.
अमरावती, दि. 4 : राज्य शासनाच्या सूचनांनुसार अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची नियुक्ती तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील 400 उमेदवारांना आज नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे यांच्यासह विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी अशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वनसंरक्षक अर्जुना के.आर., आदिवासी विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सांगितले की, शासनाने अनुकंपा नियुक्तीचे नियम सुलभ केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची नियुक्ती शक्य झाली आहे. केवळ अमरावती जिल्ह्यात 400 आणि विभागात तब्बल 1100 उमेदवारांना संधी मिळाली आहे. सर्व विभागांनी सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियुक्त उमेदवारांनी लोकाभिमुख कार्य करून विश्वासाला पात्र ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी माहिती दिली की, शासनाच्या दीडशे दिवसांच्या उपक्रमांतर्गत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीला विशेष प्राधान्य दिले गेले. उमेदवारांना तीन वर्षांपर्यंत दावा करण्याची मुदत तसेच उमेदवार बदलण्याची संधी देण्यात आल्याने अनेकांना फायदा झाला आहे. आता नियुक्त झालेल्या प्रत्येकाने जबाबदारीने व संवेदनशीलतेने कार्य करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान खासदार व आमदारांनी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सोहळ्याच्या सुरुवातीला मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
या प्रसंगी वन विभागातील ज्योती कोरडे व पोलीस विभागातील धनश्री टेकाम यांनी आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी केले तर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आभार प्रदर्शन केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0