"सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?" — मंत्री संजय शिरसाट यांचे वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत!

Aug 3, 2025 - 14:25
Aug 3, 2025 - 14:48
 0  1
"सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?" — मंत्री संजय शिरसाट यांचे वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत!

अकोला : राज्यातील अनेक मंत्र्यांचे, लोकप्रतिनिधींचे वादग्रस्त विधान समोर येत आहेत. त्यात आता आणखी एका मंत्र्याने वादग्रस्त विधान करत चर्चेला जागा निर्माण करुन दिलीय. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यात बोलताना एक वादग्रस्त विधान केल्यानं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? : अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले, "आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?." संजय शिरसाट यांनी बेधडकपणे केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 राज ठाकरेंवर टीका : सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण वेगळं नसल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली होती. "त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं नसेल, मात्र आमच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं," असल्याचं म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी जर टीका केली असेल तर आम्ही टीका करणार नाही, असं म्हणून शिरसाट यांनी राज ठाकरे हे दखलपात्र नसल्याचंही स्पष्ट केलं.

काँग्रेसवर हल्लाबोल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग भाजपाकरिता मत चोरी करत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना संजय शिरसाट हे "राहुल गांधी हे देशात नव्हे तर परदेशात जाऊन भाष्य करत असल्याचं" म्हणाले. जोपर्यंत राहुल गांधी पुरावे सादर करतील तोपर्यंत 2029 च्या निवडणुका लागल्या असतील, असेही ते म्हणाले

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0