महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही : मुख्यमंत्री फडणवीस - MAHADEVI ELEPHANT CASE

Aug 5, 2025 - 19:26
 0  0
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही : मुख्यमंत्री फडणवीस - MAHADEVI ELEPHANT CASE

मुंबई : कोल्हापुरातील नांदणी मठातली महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आलय. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. राज्य शासनाची यामध्ये कोणतीही भूमिका नाही. महादेवी परत यावी यासाठी कोल्हापुरात जनता रस्त्यावर उतरली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणावं, अशी जनभावना आहे. यासह मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक बोलवली होती.

राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठीशी : मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या. "कोल्हापूरमध्ये महादेवी हत्तीणीच्या विषयावरून जनता रस्त्यावर उतरली आहे. त्याची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. पण केवळ तोंडावर हात ठेऊन सरकार शांत बसत असेल तर सरकारला हे महागात पडेल. सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठाच्या माध्यमातून याचिका दाखल करावी. याचिकेच्या माध्यमातून राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठीशी असेल. यासह महादेवी हत्तीण परत येण्याच्या दृष्टीनं सरकार यात सहभागी होईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितलं.

...तर अंबानींच्या घरावर मोर्चा काढू : "जे हत्ती गुजरातला उपचारासाठी पाठवले होते. त्यातील चारहून अधिक हत्तींचा मृत्यू झाला आहे," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. "जर हत्तींचा तिथं मृत्यू होणार असेल तर त्यांना तिकडं कशाला पाठवायचं? महाराष्ट्रासह कर्नाटकातील चार हत्ती तिथं नेले आहेत. ते परत मिळत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. वेळ पडली तर आम्ही अंबानीच्या घरावर मोर्चा काढू," असा इशारा माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार : "महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. तसंच महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार आहे. नांदणी मठानं याचिका दाखल करावी. यासोबत राज्य सरकारही याचिका दाखल करणार आहे. महादेवी हत्तीण राज्यात परत आली पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. सुमारे 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठामध्ये होती. ती परत आली पाहिजे. ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. तसंच रेस्क्यू सेंटर आणि आहार याबाबतही सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत असेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत म्हणाले.

राज्य सरकारचं सकारात्मक पाऊल : "जनभावना लक्षात घेत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी बैठक घेतली. तसंच नांदणी मठानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. राज्य सरकार नांदणी मठासोबत असेल, अशी सकारात्मक भूमिका सरकारनं घेतली आहे. लोकभावना लक्षात घेत महादेवी हत्तीण परत यावी, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी दर्शवली आहे. हे राज्य सरकारचं सकारात्मक पाऊल आहे, असं म्हणावं लागेल," अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

अचनाक कबुतरखाने बंद करणं योग्य नाही : मंगळवारी मुंबईतील कबुतरखान्याबाबत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. "कबुतरखाना अचनाक बंद करणं योग्य नाही. कुबतरखान्याबाबत पालिकेनं हायकोर्टात ठाम भूमिका मांडावी," असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कबुतरखाने बंद होऊ नये यासाठी राज्य सरकार हायकोर्टात बाजू मांडणार आहे. तसंच यासाठी एक समिती गठीत केली जाणार आहे. ज्या कबुतरखान्याच्या ठिकाणी पाण्याची नळजोडणी तोडली होती, ती पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, मुंबईतील कबुरतखाने बंद होऊ नयेत यासाठी जी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

कबुतरखाने सुरू राहणार : "कबुतरखान्याच्या ठिकाणी जी घाण व्हायची ती साफ करण्यासाठी मशीनचा वापर केला जाईल. लोकांना कबुतरखान्याचा कोणताही त्रास होणार याची खबरदारी घेण्यात येईल. कबुतरखान्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पर्यायी जागेसाठी मी पालिकेला पत्र लिहलं होतं. परंतु, आता आरोग्याच्या दृष्टीनं ज्या सूचना आहेत. त्या कमिटी आणि पालिका सांगेल. कबुतरांना खाऊ टाकल्यामुळं जर कोणाला त्रास होत असेल तर त्याबाबत खबरदारी म्हणून अद्यावत मशीनचा वापर करुन स्वच्छता करण्यात येईल," असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0