मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभरावर वाघ; मग नरभक्षक कोण? वन्यजीवप्रेमींचा सवाल

Sep 13, 2025 - 14:26
Sep 13, 2025 - 14:49
 0  10
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभरावर वाघ; मग नरभक्षक कोण? वन्यजीवप्रेमींचा सवाल

अमरावती | देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या शंभराच्या पुढे गेल्याचे वनविभागाने जाहीर केले आहे. मात्र, अलीकडील काळात वाढलेल्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुंबई आणि हरीसाल येथे झालेल्या बैठकीत नरभक्षक वाघाला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, नेमका तो वाघ कोणता हे निश्चित करणे हेच वनविभागासमोरचे मोठे आव्हान बनले आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

व्याघ्र प्रकल्प स्थापन होण्यापूर्वी येथे केवळ २७ वाघांची नोंद होती. मात्र आता सिपना, गुगामल आणि आकोट या विभागांचा मिळून सुमारे २,००० चौ.कि.मी. परिसर वाघांचे अधिवासस्थान ठरले आहे. यात मेळघाट, नरनाळा, अंबाबखा आणि वान अभयारण्याचा समावेश असून, १,५०० चौ.कि.मी. क्षेत्र ‘क्रिटिकल टायगर हॅबिटॅट’ म्हणून घोषित केले गेले आहे.

भीतीचं वातावरण

गेल्या तीन महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला आहे. नुकत्याच २ सप्टेंबरला गुगामल वनक्षेत्रातील धामणीखेडा बीटमध्ये वनमजुराचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चर्चेत असलेल्या नरभक्षक वाघाचा शोध कॅमेरा ट्रॅपद्वारे सुरू आहे, पण त्याचा मागोवा घेणे सोपे नाही, असे अधिकारी सांगतात.

वन्यजीवप्रेमींची मागणी

वाघांच्या हल्ल्याच्या बहुतांश घटना या अतिसंरक्षित भागात घडल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना जागरूक करणे, जंगलात चेकपोस्ट उभारणे, ये-जा करणाऱ्यांची नोंद ठेवणे आणि मानवी-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

“नरभक्षक वाघ कोणता हे शोधणे हे आव्हानात्मक आहे. मात्र, स्थानिकांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना गरजेच्या आहेत.”
नीलेश कंचनपुरे, अध्यक्ष, ‘वॉर’ संस्था, अमरावती

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0