माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून बेपत्ता; त्यांच्या शोधासाठी याचिका दाखल करणार - संजय राऊत - SANJAY RAUT

मुंबई : "माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत. प्रकृती उत्तम असतानाही, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं गेलं, हे अत्यंत धक्कादायक होतं. पण, राजीनामा दिल्यापासून ते कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, मुळात ते आहेत ना? त्यांना कुठं गायब केलंय का? या शंका आमच्या मनात येत आहेत. अशाप्रकारे आपल्याला नको असलेले नेते, गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे. तशी परंपरा या लोकांनी सुरू केली आहे का?," असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
'हेबियस कॉर्पस' याचिका दाखल करावी : रविवारी (10 ऑगस्ट) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "उद्धव ठाकरे दिल्लीत आले असताना, कपिल सिब्बल आणि आम्ही धनखड यांच्याविषयी चर्चा केली. याबाबतीत आमचं ठरतंय की, सर्वोच्च न्यायालयात 'हेबियस कॉर्पस' याचिका दाखल करावी. जेव्हा एखादी व्यक्ती सापडत नाही, तेव्हा अशी याचिका दाखल करून न्यायालयाच्या आदेशानं संबंधित व्यक्तीचा शोध घेता येतो," असं संजय राऊत सांगितलं.
उद्धव ठाकरेंनाही 65 जागा जिंकवून देण्याची ऑफर : संजय राऊत म्हणाले की, "निवडणुकीपूर्वी शरद पवारांना काही लोक भेटले आणि विशिष्ट रक्कम देऊन 160 जागा जिंकून देण्याचा दावा केला. मी त्याही पुढे सांगतो, अशाच काही व्यक्ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनाही भेटल्या. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. लोकसभेत आम्ही महाराष्ट्रात यशस्वी झालो. पुढं विधानसभेच्या वेळीही हे लोक पुन्हा भेटले आणि म्हणाले, 'तुम्हाला अडचणीच्या वाटणाऱ्या 60-65 जागा सांगा, आम्ही ईव्हीएमद्वारे त्या जिंकून देतो.' आम्ही त्यांचा प्रस्ताव नाकारला, कारण आम्हाला अशा मार्गाची गरज नव्हती. मात्र, त्यांनी सांगितलं की, सत्ताधारी पक्षानं ईव्हीएम आणि मतदार याद्यांद्वारे तयारी केली आहे, त्यामुळं तुमचं अपयश दिसतं. आम्ही तुम्हाला विजयी करू शकतो, असंही ते म्हणाले. आम्ही निवडणूक आयोग आणि लोकशाहीवर विश्वास ठेवला. पण आता वाटतं की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटलेल्या त्या लोकांच्या दाव्यांमध्ये तथ्य असावं," असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
उद्या राज्यभर आंदोलन :
- "महाराष्ट्रातील घोटाळेबाजांविरोधात विधिमंडळात वारंवार आवाज उठवूनही मुख्यमंत्री आणि त्यांचे दिल्लीतील नेते त्यांना पाठिशी घालत आहेत. त्यामुळं जनजागृतीसाठी आंदोलन हाच पर्याय आमच्यासमोर उरला आहे. उद्या (सोमवारी) शिवसेना (उबाठा) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या सरकारविरोधात आंदोलन करेल. उद्धव ठाकरे स्वतः दादर येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसंच, दिल्लीत इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष खासदार आणि नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर लाँग मार्च काढणार आहेत," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
- याचबरोबर, "राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपाचा इतका मोठा घोटाळा पुराव्यांसह बाहेर काढल्यानंतरही निवडणूक आयोग राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र देण्याची सूचना करतो, हे हास्यास्पद आहे. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीनं बोलतात. त्यांनी त्यावर संशोधन केलेलं आहे. त्यांनी मतचोरीचे जे पुरावे समोर ठेवले, त्याची शाहनिशा अनेक माध्यमांनी केली. तरीही निवडणूक आयोग शपथपत्र मागत असेल, तर त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे, हे खेदानं नमूद करावं लागेल. अशा निवडणूक आयोगाविरोधात उद्या सर्वपक्षीय लाँग मार्च काढला जाणार आहे," असं संजय राऊत यांनी सांगितलं.
व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय संशयास्पद : पुढं संजय राऊत म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय हा अतिशय गंभीर आहे. आम्ही कुणाला मतदान केलं, हे मतदाराला कळणारच नसेल, तर मतदान यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा? माझं मत मी कोणाला दिलंय, हे पाहण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला दिलेला आहे. मोदी-शाह आणि फडणवीसांसारखे लोक सत्तेच्या बळावर मतचोरी करून निवडणुका जिंकतात, त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेत," असा दावाही संजय राऊत यांनी केला. तसंच "याविरोधात आम्ही लोकांना आतापासून जागं करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका शिवसेनेकडे कायम राहिलेल्या आहेत. त्या भाजपाच्या हातात देण्यासाठी निवडणूक आयोग काम करतोय का?, अशी शंका येत आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये, या षडयंत्राचा भाग म्हणून व्हीव्हीपॅटशिवाय एकतर्फी निवडणुका घेतल्या जात आहेत का? असाही संशय येतो," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपानं जैन समाजाला हिंसक बनवलं : कबुतरखान्यांवरील बंदी हटवण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील काही महिलांच्या हाती चाकू होता, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, "जैन समाज हा परंपरेनं अहिंसक आणि संयमी मानला जातो. पण, हातात चाकू घेऊन ते हिंसक होत असतील, तर ते त्यांच्या धर्माचा विचार पाळत नाहीत. या समाजाला हिंसक बनवण्याचं काम भाजपा आणि नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळं हा समाज त्यांच्या मूळ विचारांपासून दूर होत चालल्याचं दिसत आहे," असा दावा संजय राऊत यांनी केला.
What's Your Reaction?






