नाशिकमध्ये एकाच दिवसात ‘डिजिटल अरेस्ट’ची चार प्रकरणं; सायबर गुन्हेगारांनी 1 कोटी 29 लाख रुपये लुबाडले - NASHIK CYBER FRAUD

Aug 10, 2025 - 18:19
 0  1
नाशिकमध्ये एकाच दिवसात ‘डिजिटल अरेस्ट’ची चार प्रकरणं; सायबर गुन्हेगारांनी 1 कोटी 29 लाख रुपये लुबाडले - NASHIK CYBER FRAUD

नाशिक : शहरात एका दिवसातच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीची 4 वेगवेगळी प्रकरणं समोर आली असून, त्यामध्ये दोन महिला, एक वकील, आणि एक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणांचा तपास अधिक खोलात जाऊन करण्यासाठी नाशिक सायबर पोलीस पथक लवकरच दिल्लीकडे रवाना होणार आहे.

नेमकं काय घडलं? : दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका दिवसात 4 ‘डिजिटल अरेस्ट’ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगारांनी स्वतःला राष्ट्रीय तपास यंत्रणा (जसे CBI/ED) किंवा इतर तपास अधिकारी असल्याचं भासवलं. तसेच, तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल सिम कार्ड यांचा गैरवापर टेरर फीडिंगसाठी होतोय, असं सांगून नागरिकांकडून एकूण 1 कोटी 29 लाख रुपयांची वसुली केली. या प्रकरणी दिल्ली सायबर पोलिसांनी पांडगंज भागातून 4 संशयितांना अटक केली आहे. यामध्ये इमरान कुरेशी, असद कुरेशी, जावेद कुरेशी, सागर देव यांचा समावेश आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अभिषेक यादव यालाही मध्य प्रदेशातून अटक झाली असून तो सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. या टोळीच्या तपासातून देशातील डिजिटल अरेस्ट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता असून, नाशिकमध्येही या गुन्ह्यांसंदर्भातील अधिक तपास होणार आहे. वरील सर्व आरोपींची चौकशी करण्यासाठी नाशिक सायबर पोलीस लवकरच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे.

डिजीटल अरेस्टचं पहिलं प्रकरण : नाशिकमध्ये एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचं भासवलं आणि अटक वॉरंट दाखवलं. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी 25 लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन मागितली.

दुसरं प्रकरण : गंगापूर रोडवरील एका वकिलाला संशयितांनी स्वत:ला एनआयए अधिकारी (राष्ट्रीय तपास यंत्रणा) असल्याचं भासवलं आणि त्यानंतर अटक वॉरंटची भीती दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन वेगवेगळ्या टप्प्यात, एकूण 36 लाख 66 हजार रुपये रक्कम ऑनलाईन मागवून घेतले.

तिसरं प्रकरण : नाशिक शहराच्या लेखानगर परिसरातील एका महिलेला संशयितांनी ‘दिल्ली क्राइम ब्रँच अधिकारी’ असल्याचं सांगितलं. एका प्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती दाखवत 9,38,000 बँकेच्या खात्यात टाकण्यास भाग पाडलं.

चौथं प्रकरण : टागोरनगर येथील महिलेला संशयितांनी सीबीआय अधिकारी असल्याचं सांगितलं. तसेच, महिलेला डिजिटल अरेस्ट करत दोन दिवस घरात डांबून ठेवलं. तुमच्या आधार व सिम कार्डचा वापर टेरर फंडसाठी झाल्याचं सांगत महिलेला 30 लाख रुपये भरण्यास भाग पाडलं.

दिल्ली पोलीसांनी 'डिजिटल अरेस्ट' स्कॅमच्या तपासात काही संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नाशिकमधील गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. देशभरातील तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. नाशिक सायबर पोलीसही या तपासात सामील होतील. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी ही माहिती दिली. तसेच, त्यांनी सांगितलं की, "लवकरच नाशिक सायबर पोलीस पथक दिल्लीला पाठवण्यात येणार आहे". सोबतच, "कोणतीही तपास यंत्रणा फोनवर पैसे मागत नाही. अशा प्रकारचे फोन कॉल्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष करावं", असं आवाहनंही ढवळेंनी केलं. जर संशय वाटला, तर "1930" या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असंही पोलीस अधिकारी ढवळे यांनी सांगितलं.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0